Talcum Powder Cancer: टॅल्क हा जमिनीतून मिळणारा एक खनिज पदार्थ आहे. ओलावा शोषून घेणे आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी तो खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे कॉस्मेटिक कंपन्या बेबी पावडर, ब्लश, आयशॅडो आणि इतर अनेक प्रोडक्ट्समध्ये टॅल्कचा वापर करतात. त्यामुळे नकळत टॅल्कम पावडर (Talcum Powder) गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

पण गेल्या काही वर्षांमध्ये टॅल्कम पावडर आणि कॅन्सर होण्याचा धोका यांच्यातील संबंधाबाबत बरीच चर्चा झाली आहे. टॅल्कमध्ये ॲस्बेस्टॉस नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो, असा दावा केला जातो. ॲस्बेस्टॉस हा कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. नुकतेच जॉनसन अँड जॉनसनने टॅल्कम पावडरशी संबंधित खटले मिटवण्यासाठी ५.५ अब्ज डॉलर देण्याचे मान्य केले. मात्र, कंपनीने कॅन्सर होण्याचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. तरीही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही परिस्थितींमध्ये टॅल्कम पावडर वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.

टाटा मेमोरियल सेंटरच्या तज्ज्ञ काय म्हणतात?

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबईच्या कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर (CE)च्या उपसंचालक डॉ. गौरवी मिश्रा यांनी एका मीडिया संस्थेशी बोलताना सांगितले की, चिंतेचे मुख्य कारण टॅल्क नसून त्यामध्ये असण्याची शक्यता असलेला ॲस्बेस्टॉस आहे.

ॲस्बेस्टॉस हा कॅन्सरला कारणीभूत ठरणारा पदार्थ मानला जातो. टॅल्क आणि ॲस्बेस्टॉस हे नैसर्गिकरित्या एकाच प्रकारच्या खडकांमध्ये आढळू शकतात. जर खाणकाम आणि तपासणीची प्रक्रिया पुरेशी कडक नसेल, तर टॅल्कमध्ये ॲस्बेस्टॉस मिसळण्याची शक्यता असते. मात्र, टॅल्कम पावडरचा सामान्य वापर केल्याने निश्चितपणे ओव्हेरियन कॅन्सर होतो, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही.

टॅल्कम पावडर वापरणारे लोक धोक्यात आहेत का?

डॉक्टरांच्या मते, अनेक वर्षांपासून टॅल्कम पावडर वापरणाऱ्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही. जुना वापर एखाद्या आजाराचे थेट कारण आहे, असे मानणे योग्य ठरणार नाही. जर आरोग्याशी संबंधित काही समस्या किंवा असामान्य लक्षणे दिसून आली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

सावधगिरी गरजेची

तज्ज्ञ सांगतात की, ज्या महिलांच्या कुटुंबात ओव्हेरियन किंवा स्तनाचा कॅन्सर झाल्याचा इतिहास आहे, त्यांनी आपल्या डॉक्टरांशी याबाबत चर्चा करावी. याशिवाय लहान मुले, अस्थमा किंवा श्वासाशी संबंधित दीर्घकाळाचा आजार असलेले लोक आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनीही टॅल्कम पावडर वापरताना काळजी घ्यावी.

तज्ज्ञ उघड्या जखमेवर, संसर्ग झालेल्या त्वचेवर, ऑपरेशननंतरच्या जखमेवर किंवा जननेंद्रियांच्या भागात टॅल्कम पावडर लावणे टाळण्याचा सल्ला देतात. मुलांच्या चेहऱ्यावर, नाकाजवळ आणि तोंडाभोवतीही याचा वापर करू नये, कारण पावडरचे कण श्वासातून शरीरात जाऊ शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)