प्रसाद जोशी
आपल्याला हे माहीत आहे की वाहनांच्या चाकांना दिशा देण्याचे काम हे कारमधील स्टिअरिंग करीत असते. पूर्वी म्हणजे साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी जेव्हा आपण कुठलेही चारचाकी वाहन चालवीत असता चाकांना दिशा देताना अथवा वाहन वळवत असता आपल्याला स्टिअरिंग व्हील हे अगदी आपल्या दोन्ही बाहूतील शक्य तितके बळ लावून फिरवीत असू तरच चाकांना दिशा मिळत असे. म्हणजे एक प्रकारे त्या काळी चारचाकी वाहन चालविणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम होते. शक्यतो महिला वर्ग ह्या चारचाकी वाहन चालविणे हे मनात देखील आणणे अशक्य होते. पण कालांतराने अद्ययावत तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतसे स्टिअरिंग व्हीलची अंतर्गत रचना देखील बदलत गेली. आज आपण चारचाकीमधील जे स्टिअरिंग पाहतो वा वापर करीत आहोत हे अगदी सुधारित आवृत्तीमधील पॉवर स्टिअरिंग आहे. ह्याचे नावच मुळात पॉवर स्टिअरिंग आहे. ह्याचा अर्थ असा की हे स्टिअरिंग चाके फिरवीत असता अनावश्यक बळाचा वापर करण्याची आता गरज नाही. अगदी एका हाताने देखील आपण ही चाके वळवू शकतो. प्राथमिक अवस्थेत हायड्रॉलिक ऑइल व पंप ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे पण हे तंत्रज्ञान खर्चीक असल्याने ह्याचा वापर बंद होऊन कारमधील बॅटरीच्या ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक मोटरवर आधारित स्टिअरिंग चा आविष्कार झाला व त्यास इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग असे नाव दिले गेले. इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंगसाठी कुठल्याही प्रकारच्या ऑइल वा पंपची गरज नसते व ते अगदी विनासायास, विनादेखभाल कार्यरत असते. शहरातील, गावातील अगदी अरुंद रस्ते ह्या ठिकाणी कार चालविणे हे केवळ शक्य आहे ते इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंगमुळेच. कारमधील ह्या वैशिष्टय़ामुळे आता महिला वर्ग देखील कार वाहन चालवण्याकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहे. काही आधुनिक वाहनांमध्ये ह्या पॉवर स्टिअरिंगला सुरक्षेची जोड देऊन आणखी सुरक्षित केले आहे जसे जर आपण वाहन शहरात चालवीत आहात त्यावेळी स्टिअरिंगचा सुलभपणा आपल्याला मिळतो तर हेच वाहन हायवे वर वेगात असता ह्यातील सुलभपणा कमी होऊन स्टिअरिंग कणखर होते.



