टाटा स्काय आपल्या ब्रॉडबॅन्ड सेवेच्या प्लॅनमध्ये मोठे बदल करत आहे. एअरटेल आणि जिओनं नुकतेच आपले ब्रॉडबँड प्लान्स अपग्रेड केले आहेत. तसंच प्रत्येक प्लॅनसह अनलिमिटेड सेवाही दिली जात आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा कायम ठेवण्यासाठी टाटा स्कायनं ब्रॉडबँड प्लस सेवेसह मोफत लँडलाईन सेवा देण्याची घोषणा केली आहे. सध्या जिओ आणि एअरटेलकडून सर्वच प्लॅनसोबत लँडलाईन सेवा मोफत देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा स्कायनंही हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

टाटा स्कायच्या सर्व ब्रॉडबँड ग्राहकांना मोफत लँडलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे. टाटा स्कायनं यापूर्वी एक महिना, तीन महिने आणि सहा तसंच एक वर्षाची व्हॅलिडिटी असलेले प्लॅन बाजारात आणले होते. एक आणि तीन महिन्याची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना १०० रूपये अतिरिक्त देऊन लँडलाईन सेवेचा लाभ घेता येतो. तर सहा आणि १२ महिन्यांची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना मोफत लँडलाईन सेवा दिली जाते.


परंतु एअरटेल आणि जिओ पुरवत असलेल्या सेवांप्रमाणे ही सेवा नाही. एअरटेल आणि जिओच्या सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनमध्येही मोफत लँडलाईन सेवा देण्यात येत आहे. परंतु टाटा स्कायच्या सेवांमध्ये मात्र अशी सुविधा नाही. टाटा स्कायनं आपल्या ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. तसंच देशातील ठराविक सर्कल्समध्येच फिक्स्ड डेटा प्लॅन ऑफर करत आहेत. ग्राहकांसाठी एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेले दोन प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहे. ८५० रूपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबीपीएस तर ९५० रूपयांच्या प्लॅनमध्ये १५० एमबीपीएस डेटा देण्यात येतो. अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लॅनही फेअर युसेज पॉलिसीसह येतात. सर्व प्लॅन्समध्ये ३.३ टिबी टेडा एफयूपी देण्यात आली आहे.