TB symptoms : क्षयरोग (TB) हा Mycobacterium tuberculosis आणि तत्सम इतर जीवाणूंमुळे होतो. योग्य उपचार न मिळाल्यास हा आजार व्यक्तीचे आरोग्य हळूहळू बिघडवतो आणि जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे क्षयरोगाची लक्षणे वेळीच ओळखून उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एम्समधील फुप्फुसविकार तज्ज्ञ (पल्मोनोलॉजिस्ट) डॉ. अनंत मोहन यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. क्षयरोग (TB) कसा पसरतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि कोणाला याचा धोका जास्त असतो, हे समजावून सांगितले.
क्षयरोग (TB) कसा पसरतो?
डॉक्टरांच्या मते, क्षयरोग हा ‘ड्रॉपलेट इन्फेक्शन’द्वारे (म्हणजेच श्वासावाटे बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून) पसरतो. क्षयरोग झालेली व्यक्ती जेव्हा खोकते, तेव्हा त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे सूक्ष्म थेंब दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात तोंड किंवा श्वसनमार्गाद्वारे प्रवेश करू शकतात. क्षयरोगाचे जीवाणू पसरण्याचा हा सर्वांत सामान्य मार्ग आहे. क्षयरोग पसरण्याचे इतरही काही मार्ग आहेत; परंतु ते अत्यंत दुर्मीळ आहेत.
क्षयरोगाचा (TB) सर्वाधिक धोका कोणाला असतो?
डॉक्टरांच्या मते, कोणालाही क्षयरोग (TB) होऊ शकतो. मात्र, काही विशिष्ट गटांमधील व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक असतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे, अशा व्यक्तींना हा धोका अधिक असतो. कर्करोगग्रस्त रुग्ण, केमोथेरपी घेत असलेले लोक, अनियंत्रित मधुमेह किंवा मूत्रपिंड निकामी (kidney failure) झाल्याची समस्या असलेले रुग्ण आणि स्टेरॉइड्ससारखी औषधे घेणाऱ्या व्यक्तींना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते.
त्याव्यतिरिक्त दाटीवाटीच्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा हवा खेळती नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना क्षयरोगाचा (टीबीचा) धोका अधिक असतो.
क्षयरोगाची (TB) लक्षणे कोणती आहेत?
क्षयरोगाची लक्षणे ही आजारामुळे शरीराचा कोणता अवयव बाधित झाला आहे, यावर अवलंबून असतात. काही सामान्य लक्षणांमध्ये समाविष्ट असलेली लक्षणे खालीलप्रमाणे :
- टीबीच्या सुरुवातीच्या सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे दीर्घकाळ टिकणारा ताप, जो काही दिवसांपासून ते कित्येक आठवड्यांपर्यंत असू शकतो.
- या तापासोबत खोकलाही असतो. हा खोकला कोरडा असू शकतो; पण बहुतेक वेळा तो कफयुक्त असतो (ज्यातून श्लेष्मा किंवा कफ बाहेर पडतो).
- श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे व कफातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
- वजन कमी होणे आणि भूक मंदावणे असे संकेतही मिळू शकतात.
क्षयरोगाचा (TB) शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम झाला आहे, त्यानुसार त्याची लक्षणे वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ- मेंदू किंवा हृदयावर परिणाम झाल्यास विशिष्ट लक्षणे दिसून येतात आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्ये उलट्या होणे किंवा पोटदुखी, अशी लक्षणे दिसू शकतात. त्याचप्रमाणे हाडांच्या क्षयरोगामुळे सांधेदुखी आणि सूज येणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात.
क्षयरोग (TB) लक्षणांशिवाय होऊ शकतो का?
डॉक्टरांच्या मते, क्षयरोग खरोखरच लक्षणांशिवाय होऊ शकतो. जरी ही सामान्य स्थिती नसली, तरी असे घडणे शक्य आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाची इतर रुग्णांमध्ये आढळणारी सामान्य लक्षणे दिसून येत नाहीत. तरीही सखोल तपासणीद्वारे या आजाराचे निदान होऊ शकते
