7 Tips To Clean Tea Strainer : चहा बनवताना स्वयंपाकघरात वापरली जाणारी एक छोटी, पण अत्यावश्यक वस्तू म्हणजे चहाची गाळणी. रोजच्या गरम पाणी आणि दूध यांच्या संपर्कामुळे चहाची गाळणी काही दिवसांत काळीकुट्ट दिसू लागते. चहाचा रंग हळूहळू स्टीलला चिकटतो आणि दूध व चहा पावडरमुळे काळीकुट्ट झालेली गाळणी सहजासहजी साफ करता येत नाही. म्हणून बहुतेक लोक काळी झालेली चहा गाळणी फेकून देतात आणि नवीन खरेदी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, काही सोप्या घरगुती उपायांद्वारे तुम्ही काळी झालेली गाळणी अगदी चकचकीत अशी स्वच्छ करू शकता. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊ…

चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स

१) बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट गाळणीला लावा आणि १० मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर जुन्या ब्रशने किंवा स्क्रबरने घासून घ्या आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. गाळणी स्वच्छ आणि चमकदार होईल.

२) व्हिनेगर आणि गरम पाणी

एका भांड्यात समान प्रमाणात पाणी आणि व्हाईट व्हिनेगर घ्या. त्यानंतर त्यात काळीकुट्ट झालेली गाळणी ठेवा आणि १० मिनिटे ते द्रावण उकळवा. या कृतीमुळे काळे हट्टी डाग सैल होतील आणि मग ते सहजगत्या निघून गाळणी स्वच्छ होईल.

Award Banner

३) बेकिंग सोडा आणि मीठ

बेकिंग सोडा आणि जाड मीठ एकत्र करून बनवलेल्या पेस्टने गाळणी घासून स्वच्छ करा. हे दोन्ही घटक एकत्रितपणे साचलेली घाण आणि काळपटपणा काढून टाकतात.

४) लिंबाच्या साली

लिंबाच्या सालीवर थोडे मीठ शिंपडा आणि ते गाळणीवर गोलाकार फिरवून चोळा. त्यामुळे वास निघून जाईल आणि सालीला हलकीशी चमक येईल.

५) व्हाईट टूथपेस्टचा वापर

गाळणीला थोडी टूथपेस्ट लावा आणि जुन्या ब्रशने घासून स्वच्छ करा. त्यामुळे त्यावर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते.

६) हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि बेकिंग सोडा़

हे दोन्ही घटक एकत्र करून, त्याची पेस्ट बनवा आणि ती गाळणीवर लावा. त्यामुळे काळे डाग निघून जातात आणि चमकही परत येते.

७) डिटर्जंट पावडर किंवा स्टील क्लीनर

तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेल्या डिटर्जंट पावडरनेही गाळणी स्वच्छ करू शकता. त्यामुळे गाळणीला त्वरित चमक येते. या सोप्या ट्रिक्स फॉलो करून, तुम्ही कमी खर्चात गाळणी नव्यासारखी चमकवू शकता.