Sleep bruxism : तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला झोपेत दात चावण्याची किंवा एकमेकांवर घासण्याची सवय आहे का? अनेकांना याची स्वतःला जाणीवही नसते. झोपेत दात घासणे किंवा जबडा आवळण्याच्या या समस्येला ब्रुक्सिझम (Bruxism) म्हणतात. ही समस्या लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत कोणालाही होऊ शकते.

कधीतरी दात चावणे गंभीर समस्या नसू शकते. मात्र, ही कृती वारंवार होत असल्यास त्याचा दात आणि जबड्यावर परिणाम होऊ शकतो.

तणावासोबत झोपेच्या समस्यांशीही संबंध

‘ब्रुक्सिझम’चे एकच कारण नसते. तणाव आणि चिंता यांचा त्याच्याशी संबंध असू शकतो. तसेच घोरणे किंवा स्लीप ॲप्निया यांसारख्या झोपेच्या समस्यांमुळेही दात घासण्याचा धोका वाढू शकतो. कॅफीनचे अतिसेवन, धूम्रपान आणि काही औषधांचाही यामध्ये सहभाग असू शकतो.

ही लक्षणे दिसल्यास द्या लक्ष

झोपेत दात घासणाऱ्या व्यक्तीला याची जाणीव नसू शकते. मात्र, घरातील व्यक्तीला दात घासण्याचा आवाज ऐकू येऊ शकतो. त्यासोबत सकाळी उठल्यानंतर जबड्यात वेदना किंवा ताठरपणा, डोकेदुखी, दातांची संवेदनशीलता जाणवू शकते.

दीर्घकाळ आणि जोरात दात घासल्यास दातांची झीज होणे, तडे जाणे किंवा दात खराब होण्याचा धोका वाढू शकतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

वारंवार दात घासणे, दातांची झीज किंवा संवेदनशीलता, जबडा दुखणे अथवा चेहऱ्यात वेदना जाणवत असल्यास दंतवैद्याचा सल्ला घेणे योग्य ठरेल. गरजेनुसार दंतवैद्य दात आणि जबड्याची तपासणी करू शकतात. झोपेशी संबंधित विकारांचा संशय असल्यास झोपेची तपासणीही सुचवली जाऊ शकते.

उपचारांमध्ये काय करता येते?

‘ब्रुक्सिझम’वरील उपचार त्याच्या कारण आणि तीव्रतेवर अवलंबून असतात. पुरेशी झोप घेणे, झोपेची नियमित वेळ राखणे आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणे यांमुळे काही लोकांना मदत होऊ शकते. दातांचे नुकसान टाळण्यासाठी दंतवैद्य रात्री वापरण्यासाठी माऊथगार्ड वापरण्याचा उपाय सुचवू शकतात.

त्यामुळे झोपेत वारंवार दात घासण्याकडे केवळ सवय म्हणून दुर्लक्ष न करता, संबंधित लक्षणे असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.