Teeth Whitening Home Remedy: दात पिवळे पडणे, हिरड्यांतून रक्त येणे, तोंडाला दुर्गंधी येणे किंवा दातात किड लागणे या समस्या अनेकांना त्रास देतात. अशा वेळी काही लोक थेट महागडे उपचार निवडतात, तर काहीजण घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. सध्या सोशल मीडियावर स्वयंपाकघरातील काही सहज उपलब्ध वस्तूंनी दात स्वच्छ आणि मजबूत होतात, असा दावा करणारा एक उपाय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

मात्र, हा उपाय नेमका काय आहे? त्यासाठी कोणत्या वस्तू लागतात? आणि तो वापरताना कोणती काळजी घ्यावी? हे जाणून घेऊया.

नेमक्या कोणत्या वस्तू वापरल्या जातात?

या घरगुती उपायासाठी चार सहज उपलब्ध वस्तू वापरण्याचा सल्ला दिला जातो.

  • १ चमचा मेथी दाणे
  • आल्याचा एक छोटा तुकडा
  • १ चमचा मोहरीचे तेल
  • चिमूटभर तुरटी पावडर

या सर्व वस्तू एकत्र करून जाडसर वाटून त्याची पेस्ट तयार केली जाते.

वापरण्याची पद्धत काय?

तयार झालेली पेस्ट ब्रशवर थोड्या प्रमाणात घेऊन नेहमीच्या टूथपेस्टने ब्रश करण्यापूर्वी साधारण एक ते दोन मिनिटे हलक्या हाताने दातांवर फिरवण्याचा सल्ला दिला जातो.

दातांवर तंबाखू, गुटखा किंवा पानाचे हट्टी डाग असतील तर काही दिवस सकाळ-संध्याकाळ हा उपाय केल्यास फरक जाणवू शकतो, असा दावा केला जातो. मात्र, याबाबत सर्वांसाठी समान परिणाम होतील असे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

या घटकांचे संभाव्य फायदे

मेथीमध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे काही घटक असतात, त्यामुळे हिरड्यांच्या आरोग्यासाठी ती काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकते.

आल्यामध्ये जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असल्याचे काही संशोधनातून दिसून आले आहे, त्यामुळे दातदुखी किंवा हिरड्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.

मोहरीच्या तेलाचा वापर काही पारंपरिक पद्धतींमध्ये दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो, तर फिटकरीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असले तरी तिचा वारंवार किंवा अति वापर टाळावा.

तोंडाची दुर्गंधी किंवा हिरड्यांच्या किरकोळ त्रासासाठी काही जण आणखी एक घरगुती उपाय सुचवतात.

अर्धा ग्लास पाण्यात तीन लवंगा आणि थोडे मीठ घालून ते उकळावे. पाणी थंड झाल्यानंतर जेवणानंतर किंवा ब्रश केल्यानंतर त्याने चूळ भरावी. यामुळे तोंडातील काही जंतू कमी होण्यास मदत होऊ शकते आणि श्वासाची दुर्गंधी कमी होण्यासही फायदा होऊ शकतो.

हे लक्षात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे

घरगुती उपाय काही किरकोळ तक्रारींमध्ये उपयोगी पडू शकतात. मात्र, दातात किड, सतत रक्त येणे, तीव्र वेदना, हिरड्यांची सूज किंवा दात हलणे यांसारख्या समस्या असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये, अशा वेळी दंतवैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तसेच, फिटकरी किंवा इतर कोणताही घटक जास्त प्रमाणात किंवा वारंवार वापरणे टाळावे. दिवसातून दोन वेळा फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने ब्रश करणे, नियमित दंत तपासणी करणे आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळणे, हेच दात निरोगी ठेवण्याचे सर्वांत प्रभावी मार्ग मानले जातात.

अस्वीकरण : या लेखातील माहिती ही पारंपरिक घरगुती उपाय आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याला वैद्यकीय उपचारांचा पर्याय समजू नये. दात किंवा हिरड्यांशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या असल्यास दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा.