Walking After Meals for Blood Sugar: दिवसभर कामाच्या व्यापात आपण शरीराची हालचाल कमी करतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच खुर्चीवर बसणे, दूरचित्रवाणी पाहणे किंवा झोपणे या गोष्टी अनेकांच्या बाबतीत रोजच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. मात्र, जेवणानंतरची हीच काही मिनिटांची वेळ आरोग्यासाठी महत्त्वाची असते. ते लक्षात घेऊन, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवल्यानंतर थोडे चालणे उपयुक्त ठरू शकते.

हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयातील मज्जातज्ज्ञ डॉ. सुधीर कुमार यांनीही जेवल्यानंतर काही वेळ चालण्याच्या सवयीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, जेवणानंतर शरीराची थोडीशी हालचाल केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, ही सवय कोणत्याही औषधाला पर्याय नसून, त्याकडे आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग म्हणून पाहणे आवश्यक आहे.

जेवल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं?

आपण जे अन्न खातो, त्यामध्ये प्रामुख्याने कर्बोदके असतात. पचनक्रियेदरम्यान या कर्बोदकांचे विघटन होऊन, त्यापासून ग्लुकोज तयार होते. हे ग्लुकोज रक्तात मिसळल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

त्यानंतर शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाची भूमिका महत्त्वाची ठरते. इन्सुलिनच्या मदतीने रक्तातील ग्लुकोज शरीरातील पेशींमध्ये पोहोचते आणि ऊर्जेसाठी त्याचा वापर केला जातो. मात्र, जेवणानंतर शरीराची हालचाल अगदीच कमी असेल, तर रक्तातील साखरेचे प्रमाण तुलनेने अधिक वाढू शकते.

याउलट, जेवल्यानंतर थोडे चालल्यास पायांसह शरीरातील स्नायू सक्रिय होतात. हे स्नायू रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेत होणारी अचानक वाढ काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते.

मधुमेह असणाऱ्यांसाठीच नाही, तर इतरांसाठीही उपयुक्त

जेवल्यानंतर चालण्याचा फायदा केवळ मधुमेह असलेल्या व्यक्तींनाच होतो, असे नाही. नियमित शारीरिक हालचाल ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. जेवणानंतर थोडे चालण्यामुळे शरीराची हालचाल वाढते आणि दिवसभर बसून राहण्याची सवय कमी करण्यास मदत होते.

त्यामुळे शरीराची ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया, चयापचय आणि एकूण हालचाल यांनाही फायदा होऊ शकतो. विशेषतः कार्यालयीन कामामुळे दिवसभर खुर्चीवर बसावे लागणाऱ्या व्यक्तींनी जेवल्यानंतर काही मिनिटे चालण्याची सवय लावून घेणे फायदेशीर ठरू शकते.

वेगळा व्यायाम करण्यासाठी तासभर वेळ हवा का?

व्यायामासाठी स्वतंत्रपणे बराच वेळ काढणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी दिवसभरातील छोट्या-छोट्या वेळांचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ- सकाळचा नाश्ता झाल्यानंतर थोडे चालणे, दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा काही मिनिटे चालणे आणि रात्रीच्या जेवणानंतर थोडे चालणे, अशी सवय लावून घेता येते.

दिवसभरात अशा प्रकारे तीन वेळा प्रत्येकी १० मिनिटे चालल्यास एकूण ३० मिनिटांची हालचाल सहज होऊ शकते. आठवडाभरात यामुळे नियमित शारीरिक हालचालीचा चांगला कालावधी तयार होतो.

प्रत्येकाला जेवणानंतर बाहेर जाऊन चालणे शक्य असेलच, असे नाही. विशेषतः कार्यालयात असताना वेळ किंवा जागेची अडचण येऊ शकते. अशा वेळी काही वेळ उभे राहणे, कार्यालयात थोडे फिरणे किंवा शक्य तितकी शरीराची हालचाल करणे हा पर्याय असू शकतो.

मात्र, जेवण झाल्यानंतर लगेचच झोपण्याऐवजी शरीराची थोडी हालचाल करण्याची सवय अधिक चांगली ठरू शकते.

जेवल्यानंतर किती चालावे?

चालण्यासाठी सुरुवातीपासूनच मोठे लक्ष्य ठेवण्याची गरज नाही. जेवण झाल्यानंतर साधारण १० मिनिटे सहज चालण्यापासून सुरुवात करता येते. चालताना अतिशय वेगाने चालण्याची आवश्यकता नाही. आपल्या क्षमतेनुसार साध्या गतीने चालणे पुरेसे आहे.

सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण यानंतर प्रत्येकी १० मिनिटे चालण्याची सवय लावल्यास दिवसाला ३० मिनिटांची शारीरिक हालचाल सहज साध्य होऊ शकते.

मात्र, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असल्यास किंवा मधुमेहासाठी औषधे सुरू असल्यास केवळ चालण्यावर अवलंबून राहू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत किंवा त्यांच्या मात्रेत बदल करू नये. नियमित चालणे, योग्य आहार, पुरेशी झोप आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे यांचा एकत्रित परिणाम आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा ठरतो.