The science behind blue veins : आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित आपल्या हातांतील, पायांतील किंवा मनगटांतील नसांकडे पाहून ‘त्या निळ्या का दिसतात?’ असा विचार केला असेल. काहींचा तर असाही समज आहे की, आपल्या नसांमधून वाहणारे रक्त निळे असते आणि ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन मिळाल्यानंतरच लाल होते. पण हे खरंच आहे का?
दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागाचे संचालक डॉ. अंशुल कुमार जैन सांगतात की, हा एक व्यापक गैरसमज आहे. मानवी रक्त कधीही निळे नसते. नसा निळ्या दिसणे हा केवळ प्रकाश आणि त्वचा यांच्यातील एका प्रकाशीय परिणामाचा (Optical Effect) परिणाम आहे.
चला, आपण डॉक्टरांकडून हा विषय सविस्तरपणे समजून घेऊया
नसांमध्ये निळे रक्त वाहते का? (Does blue blood flow in the veins?)
डॉ. जैन सांगतात की, आपल्या शरीरातील रक्त नेहमी लालच राहते. धमन्यांमधून (Arteries) वाहणारे ऑक्सिजनयुक्त रक्त हे चमकदार लाल रंगाचे दिसते; तर शिरांमधून (Veins) परत येणारे रक्त ज्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असतेते गडद लाल रंगाचे असते. परंतु, ते प्रत्यक्षात कधीही निळे होत नाही.
मग नसा निळ्या का दिसतात? (So why do veins look blue?)
डॉक्टरांच्या मते, याचे उत्तर शरीराची रचना आणि प्रकाशाच्या स्वरूपामध्ये दडलेले आहे. जेव्हा प्रकाश त्वचेवर पडतो, तेव्हा वेगवेगळ्या तरंगलांबीचे (Wavelengths) किरण त्वचेवर आणि त्याखालील ऊतींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. लाल प्रकाश त्वचेत अधिक खोलवर शिरतो आणि जास्त प्रमाणात शोषला जातो. याउलट, निळा प्रकाश कमी खोलीपर्यंत शिरतो आणि जास्त प्रमाणात डोळ्यांकडे परावर्तित होतो.
यामुळेच त्वचेखालील नसांमधून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यांना निळा किंवा हिरवट-निळा दिसतो; मात्र त्या नसांमध्ये वाहणारे रक्त प्रत्यक्षात लाल रंगाचेच असते.
टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे
