तापमानवाढीचा कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम

याचा फटका जगातील मोठय़ा लोकसंख्येला बसत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हवामानातील बदलांमुळे उष्णता वाढून होणारे मृत्यू आणि पसरत असलेची रोगराई याचा फटका जगातील मोठय़ा लोकसंख्येला बसत आहे. याची सर्वाधिक झळ बसत चाललेल्या भारत, आफ्रिकेचा सहारा उपखंड आणि दक्षिण अमेरिकेसारख्या भागांत या बदलांमुळे कित्येक कामाच्या तासांचे नुकसान होत आहे, असे ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. हवामान बदलामुळे वाढत चाललेल्या उष्णतेच्या परिणामांचा वाढता धोका हा वाढत्या तापमानातून अनुभवास येत आहे.

याबाबत इंग्लंडमधील यॉर्क विद्यापीठाच्या हिलरी ग्रॅहम यांनी सांगितले की, ‘सध्या उष्णतेच्या स्तरांत झालेला बदल आणि कामगारांच्या कार्यक्षमतेवर त्याचा झालेला परिणाम हा तापमान बदलाच्या आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांबाबतचा ताजा इशारा आहे. हा परिणाम भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे.’

१९८६ ते २०१७ दरम्यान जागतिक तापमानात सरासरी ०.३ अंश सेल्सियस वाढ नोंदवली गेली असताना सध्या याच्या दुप्पट म्हणजे सरासरी ०.८ अंश सेल्सियस इतक्या सरासरी तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. ग्लोबल वॉर्मिग अर्थात जागतिक तापमानवाढीच्या या समस्येवरील उपाययोजनांचा वेग या प्रश्नाची तीव्रता ज्या वेगाने वाढत आहे, त्यापेक्षा कमी आहे. याबद्दल अहवालात चिंता व्यक्त केली आहे. त्याच वेळी अभ्यासकांना आरोग्याच्या दृष्टीने काही दिलासादायक बाबीही दिसत आहेत. यामध्ये, कोळशाचा कमी होत चाललेला वापर, वाहतुकीची कमी प्रदूषण करणारी साधने यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The heat death