Oral Cancer Symptoms: तोंडाचा कर्करोग (‘ओरल कॅन्सर’) तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो; जसे की हिरड्या, जीभ, गालांच्या आतील त्वचा किंवा ओठ. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे तोंडाच्या आत किंवा आसपास दिसून येऊ शकतात. जखम (अल्सर) हे याचे एक लक्षण असू शकते; मात्र जखमा होणे ही एक सामान्य गोष्ट असल्याने, प्रत्येक जखमेला कर्करोगच समजू नये. तरीही जर एखादी जखम दीर्घकाळ टिकून राहिली आणि बरी होत नसेल, तर ती चिंतेची बाब असू शकते. या संदर्भात फोर्टिस हॉस्पिटलमधील ‘हेड अँड नेक सर्जन’ (डोके आणि मान शस्त्रक्रिया तज्ज्ञ) डॉ. अंबेश सिंग यांच्याकडून जाणून घ्या की, तोंडातील व्रण (अल्सर) किती काळ टिकून राहिल्यास ते एखाद्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात आणि त्यांची तपासणी करून घेणे कधी आवश्यक ठरते.

तोंडात होणाऱ्या व्रणांकडे (अल्सरकडे) कधी करू नये दुर्लक्ष?

डॉक्टरांच्या मते, जर तोंडातील एखादी जखम किंवा व्रण दोन ते तीन आठवड्यांपर्यंत बरा झाला नाही, तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तोंडात डागही दिसू शकतात.

तोंडाच्या कर्करोगाचे आणखी एक लक्षण म्हणजे तोंडाच्या आत डाग दिसणे. हे डाग पांढऱ्या किंवा लाल रंगाचे असू शकतात.

गाठ तयार होणे

तोंडात गाठ तयार होणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशी गाठ तोंडाच्या आत कुठेही किंवा ओठांवर दिसू शकते.

तोंडात वेदना होणे

तोंडात वेदना होणे हे कर्करोगाचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. रुग्णाला खाताना किंवा अन्न गिळतानाही त्रास होऊ शकतो.

आवाजाशी संबंधित समस्या

तोंडच्या कर्करोगाचे रुग्ण असल्यास त्यांना बोलताना अडचण येऊ शकते. त्याव्यतिरिक्त‌ त्यांच्या आवाजात बदल होऊ शकतो आणि तोंडातून काही असामान्य आवाजही येऊ शकतात.

विनाकारण वजन कमी होणे

कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे विनाकारण वजन कमी होणे म्हणजेच कोणत्याही प्रयत्नाशिवाय व्यक्तीचे वजन कमी होऊ लागणे. जर कोणाला अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील, विशेषतः जर ती व्यक्ती तंबाखू किंवा गुटख्याचे सेवन करीत असेल, तर त्यांनी कोणताही धोका पत्करू नये आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यावी.