Leaves Health Benefits: भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा प्रचलित आहेत. स्वयंपाक करण्यासाठी आणि अन्न वाढण्यासाठी पानांचा वापर करणे ही त्यापैकीच एक परंपरा आहे. आजही अनेक राज्यांमध्ये लोक स्वयंपाकासाठी आणि अन्न वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा वापर करतात. काही पाने अन्नाला नैसर्गिक सुगंध देतात, तर काही पाने पदार्थातील उष्णता जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करतात.
पारंपरिक पद्धतीने पानावर जेवण करण्याची पद्धत आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. साल, केळी, पळस, कमळ यांसारख्या काही नैसर्गिक पानांचा वापर जेवण वाढण्यासाठी केला जातो. पानावर जेवण केल्याने प्लास्टिक किंवा सिंथेटिक प्लेट्सचा वापर कमी होतो, तसेच पारंपरिक भोजन पद्धतीशी जोडले जाण्याची संधी मिळते. काही पानांमध्ये नैसर्गिक वनस्पतीजन्य घटक असतात.
‘या’ पानांमधील जेवण आरोग्यासाठी फायदेशीर
केळीचे पान
केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल यांसारख्या अनेक राज्यांमध्ये केळीच्या पानांचा वापर केला जातो. त्यांचा उपयोग अन्न वाढण्यासाठी केला जातो. तसेच इडली, पाटोली, मासे आणि इतर अनेक पारंपरिक पदार्थ वाफवण्यासाठीही त्यांचा वापर होतो. केळीची पाने मोठी आणि मजबूत असल्यामुळे ती वाढायला सोपी जातात. जेव्हा त्यांच्यावर गरम अन्न ठेवले जाते, तेव्हा त्यांचा नैसर्गिक सौम्य सुगंध अन्नामध्ये मिसळून, त्याची चव वाढवतो. सण आणि लग्न समारंभात केळीच्या पानांवर अन्न वाढण्याची परंपरा आजही दक्षिण भारतात आहे.
पळसाचे पान
पळस म्हणजेच पलाशाच्या पानांपासून पारंपरिक पद्धतीने पत्रावळी आणि द्रोण तयार केले जातात. भारतातील अनेक भागांत या पानांवर जेवण वाढण्याची जुनी परंपरा आहे. विशेषतः ग्रामीण भाग, धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ आणि सामुदायिक भोजनांमध्ये याचा वापर केला जातो. FSSAI च्या माहितीनुसार पळसाची वाळलेली पाने जोडून अन्न वाढण्यासाठी पत्रावळी आणि वाट्या तयार केल्या जातात.
सालाचे पान
झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये याचा वापर केला जातो. तेथील लोक याचा उपयोग ताट आणि वाट्या बनवण्यासाठी करतात. त्याशिवाय, जत्रा, धार्मिक विधी आणि सामुदायिक मेजवान्यांमध्ये अन्न वाढण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच, सालाची पाने मजबूत असल्याने गरम अन्नाचे वजन सहज पेलतात. ती एकत्र शिवून, ताट आणि वाट्या बनवल्या जातात. प्लास्टिकला एक चांगला आणि अधिक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ग्रामीण भागात आजही त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
कमळाचे पान
आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि चीनसह अनेक आशियाई देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भात आणि इतर पदार्थ गुंडाळण्यासाठी व वाफवण्यासाठी याचा उपयोग होतो. काही ठिकाणी अन्न वाढण्यासाठीही याचा वापर केला जातो. अन्न गरम केल्यावर कमळाच्या पानांमधून पदार्थांमध्ये एक सौम्य, मातीसारखा नैसर्गिक सुगंध दरवळतो. अनेक पारंपरिक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
हळदीचे पान
याचा वापर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व ओडिशा येथे केला जातो. गोड आणि तिखट पदार्थ वाफवण्यासाठी याचा उपयोग होतो. विशेषतः गणेशोत्सव आणि इतर पारंपरिक सणांच्या वेळी याचा वापर केला जातो. हळदीच्या पानांना एक विशिष्ट नैसर्गिक सुगंध असतो. जेव्हा त्या पानांमध्ये पदार्थ शिजवले जातात, तेव्हा तोच सुगंध पदार्थांमध्ये उतरतो. महाराष्ट्रातील पाटोली आणि ओडिशामधील एंदुरी पिठा यांसारखे पदार्थ हळदीच्या पानांचा वापर करून तयार केले जातात.
