थीम पार्क ही खरंतर परदेशातील संकल्पना, पण मागच्या काही वर्षात ती भारतातही रुजताना दिसत आहे. रोजच्या धावपळीतून थोडा आराम मिळावा यासाठी कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत ट्रीपला जायचे नियोजन केले जाते. या आधी केरळ, काश्मीर, हिमाचल प्रदेश, कर्नाटक यांसारख्या ठिकाणांना पसंती देत होते. त्याशिवाय ट्रेकिंगची आवड असणारे हिमालयीन ट्रेक, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा रोड ट्रीपला जाण्याला प्राधान्य देतात. मात्र आता थीम पार्क ही एक आगळीवेगळी गोष्ट ट्रेंडमध्ये येत असल्याचे दिसत आहे.

पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा ट्रेंड आणखी वाढणार असून येत्या ५ वर्षात पर्यटकांचा थीम पार्ककडे जास्त कल असेल. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा थीम पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. तर परदेशात हे प्रमाण १८ टक्के असल्याचे कॉक्स अँड किंग्जचे जनसंपर्क प्रमुख करण आनंद यांनी सांगितले. अनेक पालक आपल्या मुलांना अभ्यासाच्या परीक्षेत किंवा इतर कोणत्याही गोष्टीत यश मिळाल्यास त्यांना सुटीसाठी थीम पार्कचे गिफ्ट देतात. कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी हे एक उत्तम डेस्टीनेशन असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पर्यटन कंपन्या तसेच एजंट केवळ महिलांसाठी, लहान मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी, जोडप्यांसाठी वेगवेगळी पॅकेज देऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यामध्ये मलेशियामधील लेगो लँड, हाँगकाँगमधील डिस्नेवर्ल्ड सिंगापूरमधील युनिव्हर्सल स्टुडियो यांचा समावेश आहे. आताही थीम पार्कला भेट देण्यासाठी चांगला सिझन असून शाळांना अजून सुट्या असल्याने अनेक जण परदेशातील सहल तसेच थीम पार्कला भेट देणे पसंत करतात. यातही तरुणांकडून वॉटरपार्क आणि बॉलिवूड पार्कला जास्त पसंती मिळत आहे. परदेशाबरोबरच भारतातही पुणे, जयपूर, सूरत, अहमदाबाद, भोपाळ, इंदौर, जालंदर अशा मोठ्या शहरांमध्ये थीम पार्क इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. थीम पार्कमध्य़े पर्यटकांसाठी अनेक अॅक्टिव्हीटी असल्याने पर्यटक त्याला पसंती देतात. यात बाली, फुकेत, सिंगापूर, दुबई, लंडन, पॅरीस, बँकॉक, पटाया, न्यूयॉर्क, हाँगकाँग या देशांचा समावेश आहे.