Kidney Damage Prevention Food: आरोग्यासाठी किडनी निरोगी राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. निरोगी किडनी म्हणजे निरोगी शरीर. किडनी संबंधित कोणत्याही समस्येचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. किडनीच्या कार्यात बिघाड झाल्याने शरीरात घाण आणि विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. किडनी आपल्या शरीरातला फिल्टर म्हणून काम करतात. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकतात. याचाच अर्थ किडनीचे कार्य बिघडल्यास शरीरात साठलेले टाकाऊ पदार्थ पूर्णपणे बाहेर काढले जाणार नाही, म्हणूनच किडनी खराब होऊ नये आणि यासंबंधित कोणतेही आजार होऊ नये म्हणून आहारात बदल करणे आवश्यक आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका अभ्यासानुसार, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी संयुगे असलेले पोषक घटक किडनीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
ब्लूबेरी
हे फळ आकाराने लहान असतं, मात्र किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते, जे रक्तवाहिन्यासंबंधी कार्य सुधारते. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी दररोज अर्धा कप ब्लूबेरीचे सेवन केल्यास मोठा फायदा होईल. बाजारात ब्लूबेरी सहज उपलब्ध असते.
फॅटी फिश
सीफूड आणि चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे सीकेडीचा धोका कमी होतो. सीकेडी अर्थात क्रॉनिक किडनी डिसीज मुळे किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होते. तुमच्या आहारात मॅकरेल आणि सार्डिनसारखे चरबीयुक्त मासे समाविष्ट करा. चरबीयुक्त मासे खाल्ल्यामुळे जळजळ कमी होते आणि रक्तदाब कमी होतो.
लाल शिमला मिरची
शिमला मिरची ही भाजी हिरवी, पिवळी आणि लाल अशी तीन प्रकारची बाजारात उपलब्ध असते. त्यापैकी लाल शिमला मिरचीचे सेवन किडनीसाठी फायदेशीर असते. कारण यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस असते. ते किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. लाल शिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते. कॅप्सेसिन किडनीतील रक्तप्रवाह नियंत्रित करण्यास मदत करते.
