Best Cooking Oil for Diabetes Patients: मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. खाण्यापिण्यात थोडासाही निष्काळजीपणा रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो, ज्यामुळे जीवघेणे परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञ म्हणतात की, मधुमेहाचा आहार निवडताना, तुम्ही कोणत्या प्रकारचे तेल वापरता आणि किती प्रमाणात वापरता याचा विचार करणेदेखील महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या आहारात कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणाकडे लक्ष देणे विशेषतः उचित आह. कारण- कार्बोहायड्रेट्सचा रक्तातील साखरेवर थेट परिणाम होतो. त्याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी खाद्यपदार्थदेखील हुशारीने निवडले पाहिजेत. आरोग्यदायी अन्न योग्य प्रमाणात निवडून, तो संतुलित आहार घेतल्यास तुमच्या रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहू शकते.

देशातील प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आणि डॉ. मोहनच्या मधुमेह विशेष केंद्राचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन त्यांच्या एका व्हिडीओमध्ये म्हणतात की, आम्ही मधुमेहाच्या रुग्णांवर व्यापक संशोधन केले आणि असे आढळून आले की, प्रामुख्याने तीन प्रकारची तेले मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत, जी मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्सच्या श्रेणीत येतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्वयंपाकाचे सर्वोत्तम तेल

  • १- शेंगदाणा तेल
  • २- मोहरीचे तेल
  • ३- तीळ किंवा जिंजेलीचे तेल

डॉ. व्ही. मोहन म्हणतात की, मधुमेहाचे रुग्ण तांदळाच्या कोंड्याचे तेल, सूर्यफूल तेल किंवा कॉर्न ऑइलदेखील वापरू शकतात, जे सर्व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटच्या श्रेणीत येतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्वयंपाकाचे सर्वांत वाईट तेल

डॉ. व्ही. मोहन सांगतात की, पाम तेल आणि नारळ तेल यांसारखी संतृप्त चरबीयुक्त तेले मधुमेहींसाठी विशेषतः धोकादायक असतात. संतृप्त चरबीच्या श्रेणीत येणारी तेले मधुमेही रुग्णांसाठी खूप हानिकारक असू शकतात आणि त्यांचा हृदयावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

संतृप्त चरबी आरोग्यासाठी हानिकारक का?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, संतृप्त चरबी शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते, ज्याला LDL म्हणूनही ओळखले जाते. कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) किंवा उच्च कोलेस्ट्रॉल पातळी मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवते.

मधुमेहात चरबी नियंत्रित करणे का महत्त्वाचे?

गुरुग्राम येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील आहारशास्त्र व पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या पांडे एका व्हिडीओमध्ये म्हणतात की, मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि चरबीचे सेवन कसे करावे यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तुमच्या हृदयाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. संध्या पांडे म्हणतात की, याचा अर्थ असा आहे की, तुमच्या आहारात चरबीचे एकूण प्रमाण ३०% पेक्षा कमी असावे. चरबीमुळे साखरेचे प्रमाण तत्काळ वाढत नाही; परंतु ते दीर्घकाळात नुकसान करू शकते.