Mansoon Tips: फळे ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करतात. नियमितपणे हंगामी आणि ताजी फळे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य, त्वचेचे सौंदर्य आणि एकूणच शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहण्यास मदत होते. मात्र, फळे नेहमी स्वच्छ धुऊन आणि योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे, विशेषतः पावसाळ्यात स्वच्छतेची अधिक काळजी घेणे आवश्यक असते.

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने फळे आणि भाज्यांना कीड लागण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः पालेभाज्या, टोमॅटो, वांगी, भेंडी तसेच आंबा, पेरू, द्राक्षे यांसारखी फळे ओलाव्यामुळे लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात ही फळे खाताना घ्या विशेष काळजी

१. आंबा

पावसाळ्याच्या सुरुवातीला बाजारात मिळणाऱ्या उशिरा तयार होण्यावर आंब्यांवर फळमाशी (Fruit Fly) आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळमाशी अंडी घालते आणि त्यामुळे आंबा आतून कुजण्यास सुरुवात होते. आंब्यावर काळे डाग, मऊ भाग किंवा दुर्गंधी आढळल्यास तो खाऊ नये.

२. पेरू

पेरू हे फळमाशीचे आवडते फळ मानले जाते. हे फळ बाहेरून चांगले दिसत असले तरी त्यामध्ये अळ्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे पेरू कापल्यानंतर तो तपासूनच खावा. छिद्रे पडलेले किंवा काळे डाग असलेले पेरू टाळावेत.

३. द्राक्षे

द्राक्षे खाण्यापूर्वी ती वाहत्या पाण्यात अनेक वेळा धुऊन घ्यावीत. खराब किंवा फुटलेली द्राक्षे बाजूला वेगळी काढून ठेवावीत.

४. केळी

केळीवर थेट कीड कमी प्रमाणात लागते; पण जास्त ओलाव्यामुळे ती लवकर पिकतात आणि साल काळी पडते. अशा वेळी बुरशी वाढण्याची शक्यता असते. खूप मऊ किंवा कुजलेली केळी खाऊ नयेत.

५. पपई

पपईमध्ये जास्त पाणी असल्यामुळे पावसाळ्यात ती लवकर मऊ पडते. या फळाची योग्य रीतीने साठवणूक न केल्यास त्यावर बुरशी चढून, ती वाढू शकते. कापलेली पपई जास्त वेळ बाहेर ठेवू नये आणि शक्यतो ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.

६. सफरचंद

सफरचंद तुलनेने टिकाऊ असले तरी दमट वातावरणात त्यावर बुरशी वाढू शकते. सालीवर काळे डाग, सुरकुत्या किंवा मऊ भाग दिसल्यास ते सफरचंद टाळावे आणि हे फळ खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन खाणे आवश्यक आहे.

७. सीताफळ

पावसाळ्याच्या शेवटी बाजारात येणाऱ्या सीताफळांमध्ये कीड किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. खूप मऊ झालेली किंवा तडे गेलेली फळे खरेदी करू नयेत.

८. डाळिंब

डाळिंबाची साल जाड असल्याने ते तुलनेने सुरक्षित असते. मात्र, फळाला तडे गेले असल्यास आतमध्ये बुरशी किंवा जंतू वाढू शकतात. तडे गेलेले डाळिंब खरेदी करणे टाळावे.

पावसाळ्यात फळे खाताना घ्यावयाची काळजी

  • फळे नेहमी वाहत्या पाण्याखाली नीट धुऊन घ्या.
  • कापलेली फळे जास्त वेळ उघडी ठेवू नका.
  • मऊ पडलेली, काळे डाग असलेली किंवा दुर्गंधी येणारी फळे खाऊ नका.
  • शक्यतो हंगामी आणि ताजी फळेच निवडा.
  • फळे स्वच्छ, कोरड्या ठिकाणी ठेवा किंवा साठवणूक करणे आवश्यक असल्यास ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

योग्य तऱ्हेने काळजी घेतल्यास पावसाळ्यातही फळांमधील जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर लाभ घेता येतो. तसेच, कीड किंवा बुरशीमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करता येतो.