Vegetables For Health: पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने पचनक्रिया मंदावू शकते आणि संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे या ऋतूमध्ये आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ताजे, गरम आणि स्वच्छ शिजवलेले अन्न खावे, तसेच हंगामी फळे, भाज्या आणि पुरेशा प्रमाणात पाणी यांचा आहारात समावेश करावा.
पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात किंवा योग्य काळजी घेऊन करणे चांगले मानले जाते. विशेषतः पालक, मेथी, कोथिंबीर, चाकवत आणि इतर पालेभाज्यांमध्ये या काळात ओलावा, चिखल आणि सूक्ष्मजंतूंचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असू शकतो. तसेच रस्त्यावर उघड्यावर विकल्या जाणाऱ्या कापलेल्या किंवा शिळ्या भाज्या टाळाव्यात. फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोलीसारख्या भाज्या वापरताना त्या नीट स्वच्छ धुऊन आणि पूर्णपणे शिजवून खाणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कोणतीही भाजी कच्ची खाण्याऐवजी ती स्वच्छ धुऊन, ताजी आणि चांगली शिजवून खाल्ल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.
दरम्यान, अशा काही भाज्या आहेत की, ज्या पावसाळ्यात आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्या स्वच्छ धुऊन, चांगल्या प्रकारे शिजवल्या, तर त्यांचे सेवन फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात आवर्जून खा ‘या’ भाज्या
१. दुधी भोपळा
- पचायला हलका असल्यामुळे पोटावर ताण येत नाही.
- शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतो.
- तंतुमयतेमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
२. दोडका
- कमी उष्मांक आणि पाण्याचे जास्त प्रमाण असल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
- पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास उपयुक्त.
- क जीवनसत्त्व आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे.
३. कारले
- अँटिऑक्सिडंट्स आणि क जीवनसत्त्वाने समृद्ध.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते.
- रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठीही उपयुक्त मानले जाते.
४. तोंडली
- तंतुमय पदार्थ आणि अ व क या जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत.
- पचन सुधारण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
- शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते.
५. भेंडी
- विद्राव्य तंतुमयतेमुळे पचनक्रिया सुधारते.
- अ व के ही जीवनसत्त्वे आणि फोलेटचा चांगला स्रोत.
- रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
६. गाजर
- बीटा-कॅरोटीनमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
- डोळ्यांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त.
- अँटिऑक्सिडंट्समुळे पेशींचे संरक्षण होते.
७. बीट
- फोलेट, लोह आणि नायट्रेट्सचा उत्तम स्रोत.
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकते.
- शरीराला ऊर्जा देण्यास आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास सहायक.
८. भोपळा
- अ व क ही जीवनसत्त्वे
- आणि तंतुमयतेने समृद्ध.
- पचनास हलका असून, प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
- त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर
