Fatty Liver Disease: फॅटी लिव्हरबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. जास्त वजन नसतानाही फॅटी लिव्हर होऊ शकतो का? फक्त अल्ट्रासाऊंड केल्याने फॅटी लिव्हरचा पत्ता लागतो का? ब्लॅक कॉफी किंवा लिव्हर डिटॉक्स टी खरंच फायदेशीर ठरते का? अशाच काही प्रश्नांवर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. युनिक त्यागी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आजकाल फॅटी लिव्हर ही फक्त जास्त वजन असलेल्या लोकांची समस्या राहिलेली नाही. डॉ. युनिक त्यागी यांच्या मते, बारीक किंवा सामान्य वजन असलेल्या व्यक्तीलाही फॅटी लिव्हर होऊ शकतो.
सुरुवातीला याचा पत्ताही लागत नाही
फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही ठराविक लक्षणे दिसत नाहीत. अनेक वेळा दुसऱ्या आजाराची तपासणी करताना अल्ट्रासाऊंड किंवा लिव्हर टेस्टमध्ये फॅटी लिव्हर असल्याचे समजते. काही लोकांना पोटाच्या उजव्या बाजूला हलका जडपणा किंवा दुखणे जाणवू शकते. मात्र, हे फॅटी लिव्हरचे ठाम लक्षण मानले जात नाही.
Grade-1 Fatty Liver कडे दुर्लक्ष करू नका
अल्ट्रासाऊंडमध्ये Grade-1 fatty liver आढळल्यास घाबरण्याची गरज नाही. मात्र, त्याकडे दुर्लक्षही करू नये. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यात जीवनशैलीत बदल करून लिव्हरमध्ये साचलेली चरबी कमी करता येऊ शकते. यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे, दररोज शारीरिक हालचाल करणे, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
फक्त अल्ट्रासाऊंड पुरेसे नाही
लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये काही रुग्णांच्या लिव्हरमधील एन्झाइमचे प्रमाण वाढलेले आढळू शकते. तर अल्ट्रासाऊंडमध्ये फॅटी लिव्हर दिसून येऊ शकतो. मात्र, हा आजार किती वाढला आहे आणि लिव्हरमध्ये फायब्रोसिसचा धोका किती आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर गरजेनुसार इतर तपासण्याही सांगू शकतात. पुन्हा तपासणी कधी करायची, हे रुग्णाची स्थिती आणि जोखीम लक्षात घेऊन डॉक्टर ठरवतात.
लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली काहीही घेऊ नका
डॉ. युनिक त्यागी यांनी लिव्हर क्लीनिंग टी आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेण्याबाबतही सावध केले आहे. त्यांच्या मते, फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी कोणतेही जादुई सप्लिमेंट नाही. शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाची किंवा खनिजाची कमतरता असेल किंवा डॉक्टरांनी एखाद्या वैद्यकीय कारणासाठी सांगितले असेल, तरच जीवनसत्त्वे किंवा खनिजांची सप्लिमेंट्स घ्यावीत. काही हर्बल किंवा डिटॉक्स प्रोडक्ट्स उलट लिव्हरला नुकसानही पोहोचवू शकतात.
आहारात या गोष्टींकडे लक्ष द्या
आहारात भाज्या, फळे आणि फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर गोड पेये, जास्त साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करावे. तज्ज्ञांनी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचा एकत्रितपणे अवलंब करण्यावर भर दिला आहे.
ब्लॅक कॉफी हा काही जादुई उपचार नाही
ब्लॅक कॉफीबाबतही लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काही संशोधनांमध्ये कॉफीचा लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो, असे दिसून आले आहे. मात्र, फक्त कॉफी प्यायल्याने फॅटी लिव्हर बरा होत नाही. कॉफीमध्ये जास्त साखर किंवा क्रीम टाकत असाल, तर शरीरात अतिरिक्त कॅलरी जाऊ शकतात. त्यामुळे कॉफीला उपचाराचा पर्याय मानता येणार नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नका
Semaglutide सारखी औषधे आणि Mounjaro सारख्या औषधांबाबतही लोकांच्या मनात प्रश्न असतात. तज्ज्ञांच्या मते, काही औषधे वजन कमी करण्यास मदत करू शकतात आणि त्यामुळे लिव्हरमध्ये साचलेल्या चरबीवरही परिणाम होऊ शकतो. मात्र, ही औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि प्रिस्क्रिप्शननुसारच घ्यावीत. प्रत्येक रुग्णाला या औषधांची गरज किंवा त्याचा फायदा सारखा असेलच असे नाही.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
