Is 5 hours sleep enough for body : अनेक जण आरोग्य चांगले राहण्यासाठी संतुलित आहार घेणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे यांवर लक्ष केंद्रित करतात. आहार व व्यायाम हे आरोग्यदायी जीवनशैलीचे आधारस्तंभ मानले जात असले तरीही आणखी एक घटक असा आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि तो म्हणजे झोप. पुरेशी व शांत झोप शरीराला दुरुस्त होऊन, पूर्ववत होण्यास आणि योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करते. एकंदरीत झोप सर्वांगीण आरोग्याचा एक आवश्यक भाग बनते.
त्याबद्दल अमेरिकेतील बोर्डकडून प्रमाणित करण्यात आलेले हृदयविकार तज्ज्ञ सर्जन डॉक्टर जेरेमी लंडन हे एका व्हिडीओमध्ये सांगतात की, झोप ही शरीराची मूलभूत गरज आहे. पुरेशी झोप न घेतल्याने शरीरावर परिणाम होतो. नियमितपणे झोपेचा त्याग केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि अनेक जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.
जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा काय होऊ शकते?
डॉक्टरांच्या मते, एका आठवड्याच्या अपुऱ्या झोपेबाबत प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये असे दिसून आले की, अपुऱ्या झोपेमुळे शरीरात अनेक बदल होऊ शकतात, जे एकूण आरोग्य व शारीरिक कामगिरीवर परिणाम करू शकतात.
१. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते
आठवडाभर कमी झोप घेतल्यानेही टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी होऊ शकते, जे शरीरातील अनेक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
२. स्नायूंची वाढ मंदावणे
पाच तासांपेक्षा झोपेमुळे स्नायूंची वाढ मंदावू शकते. नियमित प्रशिक्षण घेऊनही व्यायामानंतर शरीराची पूर्ववत होण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता तितकी प्रभावी राहत नाही.
३. रक्तातील साखरेची पातळी वाढते
जेव्हा शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) कमी होते, तेव्हा शरीर अन्नातील साखरेवर प्रभावीपणे प्रक्रिया करू शकत नाही. परिणामी, अधिक प्रमाणातील रक्तशर्करा रक्तप्रवाहातच राहते, तर स्नायू आणि इतर पेशींपर्यंत आवश्यक तेवढी साखर पोहोचत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
४. भूक वाढते
अपुऱ्या झोपेचा भुकेवरही परिणाम होतो. जेव्हा लोकांना चांगली झोप लागत नाही. तेव्हा त्यांना कर्बोदके व जास्त उष्मांकयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते.
५. जास्त उष्मांक
ज्यांची झोप पुरेशी किंवा दर्जेदार होत नाही, ते दररोज त्यांच्या नेहमीच्या आहारापेक्षा सुमारे ३०० ते ४०० अतिरिक्त उष्मांक घेतात. मात्र, हे अतिरिक्त उष्मांक खर्च करण्यासाठी ते शारीरिक हालचाल किंवा व्यायामात तितकीशी वाढ करीत नाहीत.
चांगली झोप का महत्त्वाची?
झोपेदरम्यानच शरीराची दुरुस्ती व पुनर्बांधणी होत असते. त्यामुळे चांगली झोप मिळाल्यास शरीर पूर्ववत होण्यास मदत मिळते आणि पुढील दिवसासाठी आवश्यक ऊर्जा व कार्यक्षमता टिकून राहते. तुम्ही व्यायाम व सकस आहार सेवनाच्या सवयींद्वारे आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळवू शकता. पण, झोप पूर्ण न झाल्यास त्या सवयींचे फायदे नकळतपणे कमी होऊ शकतात. अपुरी विश्रांती किंवा झोप न मिळाल्याने त्यानंतरच्या सर्व गोष्टींवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
