Must Do Home Checklist Before Your Vacation Away : दिवाळी जवळ आली की, शिक्षण किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहणारे अनेक जण सण साजरा करण्यासाठी आपल्या गावी किंवा घरी परततात. त्यामुळे काही दिवसांसाठी त्यांची घरे बंद राहतात. अशा वेळी प्रवासाची तयारी करताना घराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. घर सोडण्यापूर्वी गॅस रेग्युलेटर बंद केला आहे का, विजेची उपकरणे प्लगमधून काढली आहेत का आणि पाण्याचे नळ व्यवस्थित बंद आहेत का, याची खात्री करून घ्या. अन्यथा छोटीशी चूकही मोठ्या समस्येला कारणीभूत ठरू शकते.

म्हणूनच, घरातून बाहेर पडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे. यामुळे घर सुरक्षित राहील आणि परतल्यानंतर होणारा अनावश्यक त्रासही टाळता येईल. घराची चिंता न करता तुम्हाला सुट्टीचा आनंद घेता येईल. चला तर मग, प्रवासाला निघण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.

दिवाळीसाठी प्रवासाला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

गॅस सिलेंडर आणि स्टोव्ह

घरातून निघण्यापूर्वी, गॅस स्टोव्हवरील सर्व बर्नर बंद करा. यानंतर, सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा. जर तुम्ही अनेक दिवसांसाठी बाहेर जात असाल, तर गॅस पाईप आणि रेग्युलेटर बंद असल्याची खात्री करण्यासाठी तपासा.

विद्युत उपकरणे

घरातून बाहेर पडण्यापूर्वी पंखे, दिवे, गिझर, इस्त्री आणि इतर अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करा. चार्जर आणि इतर उपकरणे स्विचबोर्डमधून काढून टाका. जर घर अनेक दिवसांसाठी बंद राहणार असेल, तर तुम्ही मुख्य वीजपुरवठा बंद करण्याचा विचार सुद्धा करू शकता.

नळ

अनेकदा, घरातून बाहेर पडताना आपण पाण्याच्या नळांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे नळ उघडे राहू शकतात किंवा टाकी भरत असताना पाणी वाया जाऊ शकते.म्हणून, घरातून बाहेर पडण्यापूर्वी बाथरूम, स्वयंपाकघर, वॉशबेसिन आणि बाल्कनीमधील सर्व नळ व्यवस्थित बंद असल्याची खात्री करा.घरात वॉटर मोटर बसवलेली असल्यास, ती बंद केल्याची खात्री करा.

त्याचबरोबर घराच्या सुरक्षिततेसाठी ‘ही’ काही कामे देखील करून घ्या…

  • गॅस, वीज आणि पाण्याच्या नळांची तपासणी करण्याव्यतिरिक्त सर्व दारे आणि खिडक्यांची कुलुपे तपासा.
  • बाल्कनीमध्ये किंवा मोकळ्या जागेत ठेवलेल्या अशा वस्तू काढून टाका ज्यांचे वाऱ्याने किंवा पावसाने नुकसान होऊ शकते.
  • एका विश्वासू व्यक्तीकडे घराची एक अतिरिक्त चावी ठेवा आणि तुम्ही घरी नाही हे त्यांना कळवा, जेणेकरून गरज पडल्यास ते घराची काळजी घेऊ शकतील.