3 Common Habits That Damage Your Kidneys : लोकांनी जीवनशैलीनुसार इतक्या लहानसहान वाईट सवयी लावून घेतलेल्या असतात की, ते त्या सवयी चुकीच्या आहेत हेही मान्य करीत नाहीत. ते नंतर त्यांच्या लक्षात आले तरी ते त्याकडे दुर्लक्ष करीत राहतात. मग त्यामुळे हळूहळू मूत्रपिंडांच्या समस्या उदभवू शकतात. मूत्रपिंडांच्या आजाराची सुरुवातीला लक्षणं दिसत नाहीत; पण या चुकांमुळे अखेरीस मूत्रपिंडांसंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. तसेच रोज आपण अशा काही चुका आपण करीत राहतो की, ज्यांचा थेट परिणाम आपल्या मूत्रपिंडांवर होत असतो, या चुका आपण नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊ…

१) पाणी कमी पिणे

काही लोक दिवसभरात कमी पाणी पितात. पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये जमा होतात. खूप कमी पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो आणि मूत्रपिंडांवरील दाब वाढतो. मूत्रपिंडे सक्षम ठेवण्यासाठी दररोज आठ ते नऊ ग्लास पाणी प्या.

२) जास्त प्रमाणात मीठ खाणे

जास्त प्रमाणात मीठ खाणे हे मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. अतिरिक्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, जो मूत्रपिंडांसाठी हानिकारक ठरू शकतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्याने मूत्रपिंडांची शुद्धीकरण क्षमता कमी होत जाते.

Award Banner

३) लघवी रोखून धरणे

काम करताना लोक अनेकदा लघवी रोखून धरतात. लघवी रोखून धरणे हे मूत्रपिंडे आणि मूत्रमार्ग या दोन्हींसाठी अत्यंत हानिकारक आहे. जर तुम्ही जास्त वेळ लघवी रोखून धरली, तर या सवयीमुळे तुमच्या मूत्रपिंडांना इजा होऊ शकते.

‘ही’ लक्षणे दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला वारंवार थकवा, पायांना सूज, लघवीचा रंग बदल किंवा भूक न लागणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे मूत्रपिंडांच्या समस्येसंबंधित लक्षणे असू शकतात.

मूत्रपिंडे सक्षम ठेवण्यासाठी उपाय

डॉक्टरांच्या मते, मूत्रपिंडे सक्षम ठेवण्यासाठी मीठ आणि साखरेचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे, दररोज व्यायाम करावा, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषधे घेऊ नयेत आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी.