Colon cancer symptoms: मोठ्या आतड्याचा कर्करोग, जो एकेकाळी फक्त वृद्धांमध्ये सामान्य मानला जात होता, तो आता तरुणांना धोकादायक दराने प्रभावित करीत आहे. सीडीसीच्या आकडेवारीनुसार, १९९९ ते २०२० पर्यंत २० ते २४ वयोगटातील प्रौढांमध्ये आतड्याच्या कर्करोगात १८५% वाढ झाली आहे आणि १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये ३३३% वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०२० मध्येच आतड्याच्या कर्करोगामुळे ९,३०,००० हून अधिक मृत्यू झाले. लक्षणे लवकर ओळखल्याने जीवन आणि मृत्यूंमधील फरक निर्माण होऊ शकतो. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षित कॅलिफोर्नियातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सावधानतेचा इशारा देणारी आतड्याच्या कर्करोगाची पाच चिन्हे सांगितली आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करू नये.

मोठ्या आतड्याचा कर्करोग म्हणजे काय?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार मोठ्य आतड्यात किंवा गुदाशयात सुरू होणाऱ्या कर्करोगाला मोठ्या आतड्याचा कर्करोग म्हणतात. जेव्हा आतड्यामध्ये कर्करोग सुरू होतो तेव्हा त्याला आतड्याचा कर्करोग म्हणतात.

आतड्याच्या कर्करोगाची ५ लपलेली लक्षणे जी वेळीच ओळखल्यास तुमचे जीवन वाचू शकते: डॉ. दीप गोयल

वय, कौटुंबिक इतिहास, वारशाने मिळालेले आतड्याच्या कर्करोगाशी संबंधित उत्परिवर्तन (HNPCC, FAP व Peutz-Jeghers polyposis), दाहक आतड्यांसंबंधी रोग (IBD)चा इतिहास आणि पर्यावरणीय व जीवनशैलीशी संबंधित घटक आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

आतड्याच्या कर्करोगासंबंधीचे संकेत

“अधिकाधिक तरुणांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचे निदान होत आहे,” असे डॉ. सेठी म्हणाले. आतड्याचा कर्करोग लवकर ओळखल्याने उपचार पर्याय आणि परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. येथे त्यासंबंधीची पाच लक्षणे दिली आहेत, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये.

रक्त येणे

गुदाशयातून रक्त येणे हे आतड्याच्या कर्करोगाचे सूचक चिन्ह असू शकते. जर तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये किंवा टॉयलेट पेपरवर मलविसर्जनानंतर रक्त आढळले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

तुमच्या मलमूत्राच्या आकारात बदल

होय, तुम्ही सकाळी अंघोळीला जाण्याआधी तुमच्या मलमूत्र हालचालींतील बदलांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. डॉ. सेठी यांनी याबाबत, “तुमच्या मलमूत्राच्या आकारात बदल होणे हा आतड्यांच्या कर्करोगाचा संकेत असू शकतो,” असे नमूद केले. म्हणून जर तुम्हाला तुमच्या मलमूत्रात काही बदल दिसले आणि ते सतत दिसत राहिले, तर डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. जर तुमचा मल अचानक पातळ, रिबनसारखा किंवा पेन्सिलसारखा दिसू लागला आणि हा बदल अनेक दिवस टिकला, तर तो सावधगिरीचा इशारा असू शकतो.

दीर्घकालीन पोटदुखी

तुम्हाला अनेकदा पोटात वेदना होतात का? डॉ. सेठी यांनी इशारा दिला की, दीर्घकालीन पोटदुखी हे आतड्यांच्या कर्करोगाचे एक प्रमुख लक्षण आहे. जर तुमचे सततचे पेटके, पोटफुगी किंवा अस्वस्थता हे त्रास सामान्य उपायांनी दूर होत नसतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

अनावश्यक वजन कमी होणे

अचानक वजन कमी होणे हे विविध कर्करोगांसाठी धोकादायक आहे. जर तुम्हाला तुमच्या आहारात किंवा व्यायामाच्या दिनचर्येत बदल न करताही तुमचे वजन कमी होत असल्याचे दिसून आले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. हेदेखील आतड्यांच्या कर्करोगाचे लक्षण आहे.

थकवा

तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? रात्रीच्या शांत झोपेनंतरही जर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर ते गंभीर आहे. दुर्दैवाने, हे एक महत्त्वाचे लक्षण आहे, जे दुर्लक्षित केले जाऊ शकते. लोक बहुधा त्याकडे साधा थकवा म्हणून दुर्लक्ष करतात. परंतु, जर तुम्हाला वारंवार, कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवत असेल, तर त्याबाबत वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

लोहाच्या कमतरतेचा अशक्तपणा

नियमित रक्त तपासणीद्वारे हे लक्षण आढळून येईपर्यंत बहुतेकदा आपण शांत असतो. दरम्यानच्या काळात आतड्यांमध्ये ट्यूमर हळूहळू वाढून सातत्याने रक्तस्राव होऊ शकतो, ज्यामुळे लोहाची कमतरता उदभवू शकते. “तुम्हाला कोणताही स्पष्ट रक्तस्राव दिसला नाही. तरीही लोहाच्या कमतरतेनं अशक्तपणा येऊ शकतो,” असे डॉ. सेठी यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

वरील लक्षणे आणि चिन्हे आतड्यांचा कर्करोग दर्शवू शकतात; मात्र कर्करोग असेलच, असे नाही. “लक्षात ठेवा की, या समस्या इतर अनेक वैद्यकीय परिस्थितींमध्येदेखील दिसू शकतात. म्हणून तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा,” डॉ. सेठी म्हणाले. मात्र, या लक्षणांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे. कारण- लवकर निदान जीव वाचवू शकतो.