Hair Oil: भारतात केसांना तेल लावण्याची पद्धत ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आयुर्वेदिक परंपरेत केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी तेलाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूर्वी नारळ, तीळ, आवळा, भृंगराज यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली तेले केसांना लावली जात. आठवड्यातून ठरावीक दिवशी केसांना तेल लावून हलक्या हाताने टाळूची मालिश करण्याची पद्धत अनेक घरांमध्ये होती. तेलामुळे टाळूला ओलावा मिळतो आणि मालिश करताना आरामदायी अनुभव मिळतो.
केसांना तेल लावणे फायदेशीर ठरू शकते, मात्र ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. अनेक जण घाम आलेला असताना, केस ओले असताना किंवा टाळूवर आधीच जास्त तेलकटपणा असताना तेल लावतात. अशा वेळी टाळूवर तेल, घाम आणि धूळ साचल्याने कोंडा किंवा टाळूची समस्या वाढू शकते आणि केस गळण्याची समस्या जाणवू शकते, त्यामुळे केसांच्या प्रकारानुसार तेल लावण्याची योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे.
केस धुण्याआधी तेल लावणं उत्तम
केस धुण्याआधी तेल लावणे अनेकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. केस धुण्याच्या काही तास आधी हलक्या हाताने तेल लावल्याने केसांना कंडिशनिंग मिळण्यास मदत होते आणि धुताना केसांचा कोरडेपणा कमी जाणवू शकतो. मात्र, तेल रात्रभर ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक नाही; विशेषतः टाळू तेलकट असेल, कोंडा किंवा टाळूची समस्या असेल, तर केसांवर जास्त वेळ तेल ठेवणे टाळावे.
केसांमध्ये तेल रात्रभर ठेवणे टाळावे
केसांना तेल लावण्याची पद्धत योग्य असणे तितकेच महत्त्वाचे आहे. केस धुण्याच्या आदल्या रात्री तेल लावून, ते रात्रभर तसेच ठेवणे टाळावे. त्याऐवजी केस धुण्याच्या काही तास आधी हलक्या हाताने तेल लावणे अधिक योग्य ठरू शकते. रात्रभर तेल ठेवल्याने प्रत्येकाला अतिरिक्त फायदा होतोच, असे नाही; उलट काही जणांमध्ये टाळूवर तेलकटपणा, धूळ किंवा कोंड्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे केसांच्या प्रकारानुसार तेल लावण्याची वेळ ठरवावी.
केसांना तेल योग्य प्रमाणात लावा
जर तुमचे केस खूप कोरडे आणि तुटणारे असतील, तर तुम्ही टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत थोडेसे तेल लावू शकता. याउलट, जर तुमची टाळू खूप तेलकट असेल, तर तुम्ही थेट टाळूवर जास्त तेल लावू नये.
तेल लावल्यानंतर ‘या’ चुका टाळा
केसांना तेल लावल्यानंतर टाळूला जोरात मालिश करणे टाळा. कारण- त्यामुळे केसांच्या मुळांवर ताण येऊ शकतो. केसांमध्ये तेल जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी, वारंवार तेल लावण्याऐवजी हलक्या हाताने मसाज करून ते मुळांपर्यंत व्यवस्थित जिरवणे अधिक गरजेचे असते. केस धुताना टाळू पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करा, जेणेकरून त्यावर अगोदरपासून साचलेली धूळ वा कचरामिश्रित थर निघून जाईल.
