What Habit Doubles The Risk Of A Heart Attack : आजकाल तरुण वयातच हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय. यासाठी आपल्या रोजच्या काही सवयी कारणीभूत असल्याचे मत हृदयरोगतज्ज्ञांनी व्यक्त केलंय, जेव्हा हृदयाच्या स्नायूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा पुरेशा वेगाने होत नाही तेव्हा हृदयाच्या स्नायूला इजा होऊ शकते किंवा त्या भागाचे कार्य थांबू शकते. यावर इंटिग्रेटिव्ह हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय भोजराज यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यात त्यांनी हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत असलेल्या एका सवयीबाबत इशारा दिला आहे.
हृदयविकारासाठी कोणती एक सवय ठरतेय कारणीभूत?
डॉ. संजय भोजराज सांगतात की, अनेक वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लोकांची एक सवय, जी प्रत्येक वेळी जाणवते. ही सवय म्हणजे लोक तासनतास एकाच जागी बसून राहतात. रोजच्या या एका सवयीमुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका दुपटीने वाढतोय. पण, बहुतेक लोक याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, अनेक लोक हृदयविकारासाठी वाईट आहार आणि मद्यपान, धूम्रपान या गोष्टींना जबाबदार धरतात, पण या गोष्टींसह शारीरिक हालचालींचा अभाव हे देखील हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे.
बराचवेळ एकाच जागी बसून राहण्याचे धोके
हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ एकाच जागी बसल्याने चयापचय क्रिया मंदावते. जेव्हा शरीर स्थिर राहते तेव्हा रक्तातील चरबी पचवणाऱ्या एन्झाइम्सची पातळी कमी होते. आजकाल जास्त वेळ बसण्याला एक आजार म्हटले आहे. अभ्यासातून असे दिसून आले की, जे लोक दिवसातून ८ ते १२ तास सतत एका जागी बसून असतात, त्यांना हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
हृदयविकार टाळण्यासाठी काय केलं पाहिजे?
तासनतास बसल्याने रक्ताभिसरण क्षमता कमी होते आणि रक्त्तातील साखरेचे प्रमाण वाढते, यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो, त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणजे जिममध्ये जाऊन कठीण व्यायाम करणे नाही तर काही छोटे बदल करणे गरजेचे आहे. डॉक्टर सांगतात, दर ३० ते ६० मिनिटांनी उठून थोडं चाला, काही स्कॅट्स करा, दररोज आपल्या शरीराची हालचाल होऊ द्या.
