Which Herbal Tea To Drink In High Cholesterol : शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल (LDL) चे प्रमाण वाढल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये साचून प्लाक तयार करते. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही विशिष्ट हर्बल चहाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला ‘माय एक्सपर्ट डॉक्टर’ युट्यूब चॅनेलच्या संस्थापक आणि एमबीबीएस, एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. शालिनी सिंग साळुंखे यांनी दिला आहे. नियमितपणे या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश केल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
जास्वंदाचा चहा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ((Jasmine tea and cholesterol control)
जास्वंदाचा (हर्बल) चहा हा बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या चहामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल्स आणि प्रोटोकॅटेच्युइक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात. रात्रीच्या वेळी या चहाचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहते.
दालचिनीचा चहा आणि इन्सुलिन रोध (Cinnamon tea and insulin resistance)
दालचिनीमध्ये ‘सिनेमाल्डिहाइड’ नावाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, जो शरीरातील इन्सुलिन रोध (Insulin Resistance) कमी करण्यास मदत करतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे किंवा ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे, त्यांच्यासाठी दालचिनीचा चहा उत्तम पर्याय मानला जातो. हा चहा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतोच, शिवाय वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयावरील ताण कमी करण्यास मदत करतो.
आल्याचा चहा आणि शरीरातील दाह कमी करणे (Ginger tea and reducing inflammation in the body)
आल्याचा चहा हा शरीरातील जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी उत्तम मानला जातो. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. हे घटक रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करून रक्ताभिसरण सुरळीत ठेवतात. नियमितपणे आल्याच्या चहाचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला बळकटी मिळते आणि हृदयविकाराचा धोका घटतो.
मेथीचा चहा आणि कोलेस्ट्रॉलचे शोषण रोखणे (Fenugreek tea and blocking cholesterol absorption)
मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर (Soluble Fiber) आणि सॅपोनिन मुबलक प्रमाणात असतात. हे घटक कोलेस्ट्रॉलला रक्तात शोषले जाण्यापासून रोखतात. मेथीचा चहा आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल बांधून ठेवतो आणि त्याला शरीराबाहेर टाकून देण्यास मदत करतो. याशिवाय हा चहा यकृतामध्ये खराब कोलेस्ट्रॉलच्या निर्मितीला आळा घालतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात.
