‘लगीन म्हने करी पाह्य.. नि घर म्हने बांधी पाह्य…’ अशी अहिराणीत म्हण आहे. अंथरूण पाहूनच पाय पसरावे, असंही जुन्या लोकांनी सांगून ठेवलं आहे; मात्र त्याकडे आपण सारेच दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. लग्नाचा सीझन सुरू झालाय. या वर्षाच्या हंगामात जवळपास ३८ लाखांहून अधिक लग्नं होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या विवाहांमुळे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापाऱ्यांच्या गटाने यावेळी देशात सुमारे ४.७४ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या लग्नसाहित्याच्या किंमती गगनाला भिxडल्या आहेत. सोने-चांदीच्या दागिन्यांवर महागाईचं सावट आहे. मंडप, मंगल कार्यालयं यांच्याही भाड्यांत वाढ झाली आहे. सर्वसाधारण व्यक्तीही लग्नासाठी चार लाखांवर खर्च झाल्याचं सांगते. परिणामी अवाढव्य खर्चामुळे अनेक जण कर्जाच्या विळख्यात अडकत असल्याचं आज दिसून येत आहे. एक महत्त्वाचा भाग म्हणजे पैशाची अभूतपूर्व उधळपट्टी ही बाब सर्व विवाह समारंभांत प्रकर्षानं जाणवते. पूर्वीपेक्षा स्वच्छता वाढलेली आहे, सोई वाढल्या आहेत आणि एवढ्या-तेवढ्यावरून कांगावा करणं घटलं आहे. हे सोडलं, तर आजकालचे विवाहसोहळे म्हणजे संपत्तीचं प्रदर्शन, निव्वळ नावासाठी केलेला अनाठायी खर्च, असं चित्र दिसतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वेडमी गुड’च्या अहवालानुसार, सरासरी एका विवाहसोहळ्यात ३१० मध्ये पाहुणे येतात. २०२२ च्या तुलनेत ही वाढ १४.८ टक्के आहे. प्लॅटफॉर्म या संस्थेतर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या कोरोनापूर्व काळाइतकी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेले आणि लक्षाधीश स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतःच करू इच्छितात. उपवर मुलगा आणि आणि मुलगी यांच्या कुटुंबीयांकडून निम्मा-निम्मा खर्च केला जाऊ लागला आहे. सामाजिक कल्पना बदलत चालल्याचं हे प्रतीक आहे. हाच ट्रेंड २०२४ मध्येही कायम राहील, असं या अहवालात म्हटलं आहे.

अनावश्यक खर्च टाळण्याची आवश्यकता

अनावश्यक खर्च टाळण्याची आवश्यकता आहे. दुष्काळी परिस्थितीतही ग्रामीण भागात लग्न समारंभातील उधळपट्टी कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधूपिता धूमधडाक्यात लग्नसोहळे साजरे करीत असल्याचं दिसतं. लग्नातील हे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जनजागृतीसह प्रशासन व सामाजिक संस्थानी पुढाकार घेणं गरजेचं झालं आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबांचं मिलन असतं. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राखून ठेवणं अधिक सोईस्कर ठरू शकेल, असं मत सुज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

लोकसत्ताने या संदर्भात काही व्यावसायिक, पालक आणि तरुणांशी संवाद साधला आहे. आपण त्यांची मतं जाणून घेऊ.

व्यावसायिक सल्लागार सीताराम राम घोरड याबाबत सांगतात, “लग्नामध्ये अवाढव्य खर्च करणं खूप चुकीचं आहे. आजकाल समाजामध्ये फक्त देखावा सुरू आहे. शेजारच्या मुलीचं लग्न एवढं अवाढव्य झालं. मग माझ्या मुलीचंही लग्न तेवढ्याच ताकदीनं मी करणार आहे. कोण किती श्रेष्ठ आहे? कुणाचं लग्न किती भारी आहे? कोण किती मोठं लग्न करीत आहे, अशा स्वरूपाच्या स्पर्धा आज समाजामध्ये सुरू आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज समाजामध्ये चुकीच्या नियोजनामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबांमधील शेतकऱ्याला हे सगळं सहन होत नाही; पण तो नेहमी हा विचार करतो की, समाज काय म्हणेल? समाजाला वाईट वाटू नये म्हणून तो बँकेचं कर्ज काढून, जमीन गहाण ठेवून आपल्या मुलीचं लग्न करतो. त्यामुळे तो कर्जात बुडतो. दुसऱ्यांनी काय केलं हे महत्त्वाचं नाही; तर तुम्ही काय करता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कर्ज काढून सोहळे साजरे करण्याला प्रगती म्हणत नाहीत; तर त्याला अधोगती, असं म्हणतात.”

व्यावसायिक विराज रेडकर सांगतात, “त्यांच्याकडे लग्नाच्या हॉलबाबत विचारणा करताना हॉलपेक्षा डेकोरेशनची अधिक विचारपूस केली जाते. त्यामुळे कधी कधी हॉलपेक्षा डेकोरेशनचा खर्च जास्त होतो आणि बजेट वाढत जातं. हल्ली फोटोशूट हा लग्नातला सर्वांत महत्त्वाचा भाग झाला आहे. अगदी नवरा-नवरीपासून नातेवाइकांपर्यंत फोटोंसाठी सर्वच जण हौशी असतात. त्यामुळे हॉलमध्ये सेल्फी स्पॉट, डेकोरेटिव्ह विंडो अशा पद्धतीची मागणी केली जाते.”

वेडिंग प्लॅनर अल्पेश गुरव सांगतात, “भारतात मोठ्या थाटामाटात होणाऱ्या लग्न समारंभांना ‘द बिग फॅट इंडियन वेडिंग’ म्हटलं जातं. विशेषत: मुली सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेले सेलिब्रिटी आणि लग्न समारंभ पाहून त्यांच्या लग्न समारंभाचे नियोजन करतात. लोकांच्या हातात पैसा आल्याने लोक मुला-मुलींच्या लग्नावर अवाढव्य खर्च करीत असल्याचं व्यापारी संघटनांचं म्हणणं आहे.”

हेही वाचा >> मेहंदीचा रंग, नवऱ्याचं प्रेम अन् ५ हजार वर्षांचा इतिहास; वाचा मेहंदी लावण्याचे खरे कारण 

एक पालक म्हणून वंदना या सांगतात, “लग्नात खूप पैसा खर्च करणं योग्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही, असं देता येणार नाही. माझ्या मते- आपलं अंथरूण पाहून पाय पसरावेत. जर माझ्या जवळ एक लाख रुपये असतील, तर मी ८० हजारांत लग्न उरकेल असा खर्च करावा. वरचे पैसे ऐन वेळेला उदभवणाऱ्या खर्चाची तरतूद म्हणून बाजूला राखून ठेवावेत. कर्ज काढून बडेजाव कधीच करू नये. लग्न एका दिवसाचं व कर्ज १० वर्षं फेडायची वेळ येणार असेल, तर काय उपयोग? म्हणून कर्जबाजारी होणार नाही अशी काळजी घेऊन आपल्या ऐपतीप्रमाणे जितकं जमतं तसं लग्न करावं. मुलीला आणि सुनेला सोनं-नाणं हे नंतरही हळूहळू घालता येतं प्रसंगानुसार. पैसे असतील, तर हौस करायला हरकत नाही. तरीही उगाच खूप खर्च करू नये.”

दत्तात्रय वनारसे सांगतात, “माझ्या मुलीचं लग्न झालं. तिच्या लग्नातल्या खर्चाची चिंता पूर्वी होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नात होणारा तीन ते चार लाखांचा खर्च टाळता आला. प्रत्येक कुटुंबीयानं मुला-मुलीच्या लग्नात खर्च कमी करून, त्यांच्या भविष्याची तरतूद करावी.”

नोकरी करणाऱ्या सुप्रिया गाढवे सांगतात, “अवाढव्य खर्च करून काहीच फायदा होत नाही. फोटो, कपडे, मेंदी, ब्युटी पार्लर, ढोल-ताशा, चमचमीत जेवण, मांडव यांचं कौतुक एकदाच. नंतर त्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. हे सर्व व्यवस्थित पार पडलं, तर ठीक नाही तर नातेवाईक खूप नावं ठेवतात. अति प्रमाणात खर्च करा किंवा करू नका; नावं ठेवली जाणार हे नक्की. एखाद्या गोष्टीला तुम्ही घाबरता हे लोकांना समजलं की, ते तुम्हाला घाबरविण्याचा एकही मोका सोडत नाहीत. त्यामुळे मानसिकता बदलणं गरजेचं ठरतं. समाजाची भीती मनातून काढली पाहिजे. भीती कुणाला वाटली पाहिजे; जो समाजविघातक कृत्य करतो त्याला. आ-पण नातेवाईकांच्या लग्नाला जातो. त्यांच्याकडून भेटी स्वीकारतो. म्हणून परतफेड केलीच पाहिजे, असा काही नियम नाही. चांगला बदल घडविण्याची तुम्ही सुरुवात करू शकता.”

हेही वाचा >> लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास… 

प्रवीण मुळीक हा तरुण सांगतो, “लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो आणि लक्षात राहण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं तो दिवस साजरा करतो. पण, खर्च करण्यापूर्वी स्वतःला खालील प्रश्न विचारावेत :

१. लग्नासाठी पैसे उभे करताना तुम्हाला किती महिने सेव्हिंग करावं लागलं.?

२. तितकी रक्कम ही त्या एक-दोन दिवसांत खर्च होऊन जाणार; हे योग्य आहे का?

जर तुमचं उत्तर तुम्हाला पटलं, तर नक्कीच खर्च करावा.

माझ्या मते- साध्या पद्धतीनं कमीत कमी खर्चात लग्न केलेलं उत्तम. रजिस्टर लग्न तर अतिउत्तम.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year 38 lakh weddings will be held and the turnover is estimated to be rs 474 lakh crore why are indians obsessed with big grand weddings srk
First published on: 19-01-2024 at 18:00 IST