Dhokla For Health: आपला आहार इतका अनारोग्यकारक झाला आहे की, आपण अनेकदा भूक आणि आवडीनुसार खातो. अयोग्य आहाराचे परिणाम आपल्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसून येतात. विचार न करता खाल्ल्याने केवळ पचनक्रियेवरच परिणाम होत नाही, तर विविध आरोग्य समस्यादेखील निर्माण होतात. काही लोकांची खाण्यापिण्याची दिनचर्या एकसुरी बनते आणि ते दररोज नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात तेच पदार्थ खाणे पसंत करतात.

नाश्त्यामध्ये ढोकळा खाणे ही एक सामान्य गोष्ट आहे. गुजराती लोक आठवड्यातून तीन ते चार वेळा ढोकळा खातात. आम्ही एका तज्ज्ञाशी दररोज ढोकळा खाण्याच्या आरोग्यविषयक फायद्यांबाबत चर्चा केली.

अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के. भारद्वाज यांच्या मते, ढोकळा हा आंबवलेल्या तांदूळ आणि चण्याच्या पिठाच्या मिश्रणापासून बनवलेला एक प्रसिद्ध वाफवलेला पदार्थ आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याच्या पौष्टिक मूल्यात प्रथिने आणि कर्बोदकांचा समावेश होतो. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नातील पोषक घटकांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.

ढोकळ्याचे आरोग्यदायी फायदे

ढोकळ्यामध्ये आरोग्यदायी कर्बोदके असतात. ढोकळा बनविण्यासाठी तांदूळ आणि चण्याच्या पिठाचा वापर केला जातो, ज्यामुळे त्यातील विद्राव्य तंतुमय पदार्थांचे (फायबरचे) प्रमाण वाढते. विद्राव्य फायबर पचनास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. ढोकळा जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खजिना आहे. त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली बी-समूह जीवनसत्त्वे, लोह आणि पोटॅशियम असते. तज्ज्ञांच्या मते, आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे प्रो-बायोटिक्स तयार होतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

ढोकळा हा नाश्त्यासाठी तळलेल्या पदार्थांना एक आरोग्यदायी पर्याय आहे. त्याचे सेवन केल्याने शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ढोकळ्याचा हलका आणि मऊ पोत पचनास मदत करतो. त्यामुळे पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तीदेखील याचा आनंद घेऊ शकतात.

आठवड्यातून तीन वेळा ढोकळा खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

हैदराबाद येथील यशोदा रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुठे यांच्या मते, ढोकळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, अति प्रमाणात सेवन केल्यास बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS)सारखी लक्षणे उदभवू शकतात. ढोकळ्याच्या आंबवलेल्या स्वरूपामुळे लॅक्टिक अॅसिड तयार होते, ज्यामुळे काही लोकांमध्ये पोटाच्या समस्या वाढू शकतात.

माफक प्रमाणात सेवन केल्यास ढोकळ्यामधून शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. हा पदार्थ वाफेवर शिजवलेला असल्यामुळे आणि त्यात तेलाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. तो अधूनमधून नाश्त्यामध्ये खाल्ला जाऊ शकतो; मात्र मुख्य जेवणाचा पर्याय म्हणून नियमित सेवन करणे टाळावे. माफक प्रमाणात त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.