Acidity And Tight Clothes: फिटेड जीन्स, बॉडी-फिट ड्रेस, स्टायलिश बेल्ट किंवा शेपवेअर… आजकाल आपल्या ड्रेसिंगमध्ये या गोष्टी अगदी सामान्य झाल्या आहेत. मात्र, पोटाशी संबंधित समस्या किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर खूप घट्ट कपडे तुमची अस्वस्थता वाढवू शकतात. जेवण केल्यानंतर पोटावर आणि कमरेवर जास्त दबाव येत असल्यास छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

जेवणानंतर पोट फुगतंय? कपड्यांची फिटिंग तपासा

जेवण केल्यानंतर पोट फुगणे, पोटात जडपणा जाणवणे किंवा बेल्टमुळे कमरेभोवती जास्त कसल्यासारखे वाटणे, अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर तुमच्या कपड्यांकडेही लक्ष द्या. एखादा विशिष्ट ड्रेस, जीन्स किंवा बेल्ट घातल्यानंतर छातीत जळजळ किंवा आंबट ढेकर वाढतात का, हे निरीक्षण करा.

टाइट कपडे अ‍ॅसिड रिफ्लक्स वाढवू शकतात का?

खूप घट्ट कपडे घातल्यामुळे पोटावर बाहेरील दबाव वाढू शकतो. काही लोकांमध्ये हा दबाव अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणे अधिक जाणवण्यास कारणीभूत ठरू शकतो. मात्र, केवळ टाइट कपडे हेच अ‍ॅसिडिटीचे एकमेव कारण आहे, असे म्हणता येत नाही. जर टाइट जीन्स, स्कर्ट किंवा बेल्ट घातल्यानंतर त्रास वाढत असेल, तर काही काळ सैल आणि आरामदायक कपडे वापरून पाहा. कॉटन किंवा लिननसारखे हलके फॅब्रिकही आरामदायी पर्याय ठरू शकतात.

बॉडी शेपर आणि टमी टकर वापरताय? जरा सावध

शरीराला विशिष्ट शेप देण्यासाठी बॉडी शेपर किंवा टमी टकर वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हे कपडे खूप घट्ट असतील आणि बराच वेळ पोटावर दबाव राहात असेल, तर अस्वस्थता वाढू शकते. शेपवेअर घातल्यानंतर पोटावर सतत दबाव, छातीत जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी वाढत असल्याचे जाणवल्यास फिटिंग तपासा. शरीराला खूप घट्ट पकडणारे शेपवेअर नियमितपणे वापरणे टाळणे चांगले.

फक्त कपडेच नाही, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत

अ‍ॅसिडिटी आणि अ‍ॅसिड रिफ्लक्सच्या तक्रारींमागे आहार आणि जीवनशैलीतील अनेक घटक असू शकतात. खूप मसालेदार किंवा आंबट पदार्थ, जास्त चहा-कॉफी, अतिप्रमाणात खाणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे यामुळे काही लोकांमध्ये त्रास वाढू शकतो. जेवल्यानंतर लगेच आडवे न होता थोडे चालणे आणि रात्री झोपण्यापूर्वी पुरेसे अंतर ठेवणे उपयोगी ठरू शकते.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अनिल अरोरा यांच्या मते, खूप घट्ट कपड्यांमुळे पोटावर दबाव वाढू शकतो आणि त्यामुळे काही लोकांमध्ये अ‍ॅसिडिटीची लक्षणे वाढू शकतात. त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी सैल आणि आरामदायक कपड्यांना प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर संतुलित आहार आणि योग्य दिनचर्या महत्त्वाची आहे. खूप मसालेदार, तळलेले किंवा जड पदार्थ कमी घेणे आणि झोपण्याच्या किमान तीन तास आधी जेवण पूर्ण करणे फायदेशीर ठरू शकते. वारंवार छातीत जळजळ, गिळताना त्रास, सतत उलट्या किंवा इतर त्रास होत असल्यास केवळ कपडे बदलण्यावर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.