5 Tips Buy Brinjal With Fewer Seeds And No Worms : भारतीय घरांमध्ये वांग्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. वांग्याचे भरीत, भाजी आणि पकोडे यांसारखे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. पण, कधीकधी बाहेरून ताजे आणि चमकदार दिसणारे वांगे आतून किडलेले असू शकते आणि ही गोष्ट आपल्याला कापल्यावरच लक्षात येते. पण, वांगे खरेदी करताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुम्ही कीड आलेलं वांगे खरेदी करणे मोठ्या प्रमाणात टाळू शकता.
इंडियन एक्सप्रेसच्या टीमने दिल्लीतील आयएसआयसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट हिमांशी शर्मा यांच्याशी वांगे निवडण्यासाठी काही सोप्या टिप्सबद्दल संवाद साधला. त्या म्हणाल्या की, वांगे खरेदी करताना, ते हलकेच दाबून पहावे आणि त्याची साल व देठ तपासल्याने खराब वांगे खरेदी करणे टाळता येऊ शकते.
वांगे ताजे आहे की, नाही हे ठरवण्यासाठी हलकेच दाबून पहा. ताजे आणि चांगल्या प्रतीचे वांगे दाबल्यावर हाताला घट्ट लागले पाहिजे. पण, खूप जास्त कडक सुद्धा नाही. वांग्याचा गर हलका दाब दिल्यावर किंचित खाली दबला पाहिजे आणि नंतर लगेचच मूळ आकारात परत आला पाहिजे. वांग्याचे असे मूळ स्थितीत येणे हे दर्शवते की ते अजूनही ताजे आहे आणि त्यात नैसर्गिक ओलावा टिकून आहे. जर वांगे खूप मऊ, लगद्यासारखे किंवा स्पंजसारखे वाटत असेल, तर ते जास्त पिकलेले असू शकते आणि खराब होऊ लागले आहे असे समजून जावे.
दाबल्यानंतर राहिलेल्या खुणा
वांग्याला हलका दाब दिल्यानंतर त्यावर दाबाची खूण राहिली आणि ते पुन्हा मूळ आकारात आले नाही, तर ते वांगे ताजे नसण्याची शक्यता असते. यावरून वांग्यातील ओलावा आणि टणकपणा कमी झाल्याचे दिसून येते. अशी वांगी मऊ पडू शकतात, त्यांची चवही खराब होऊ शकते आणि ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे वांगे खरेदी करताना दाबल्यावर टणक वाटणारी आणि दाब सोडताच पुन्हा मूळ आकारात येणारी वांगी निवडा.
साल आणि देठ
वांग्याची साल देखील त्याच्या ताजेपणाबद्दल बरेच काही सांगू शकते. ताज्या वांग्याची साल गुळगुळीत, चमकदार आणि तिचा रंग देखील स्वच्छ असावा. वांगी जांभळी, हिरवी, पांढरी किंवा पट्टेदार असू शकतात. त्यांची साल स्पर्शाला टणक आणि किंचित चमकदार वाटली पाहिजे. ती खूप खडबडीत, सुरकुतलेली किंवा निर्जीव नसावी.
याव्यतिरिक्त ज्या वांग्यांना काप, ठेच, भेगा, छिद्रे किंवा कोणतेही रंग बदललेले डाग असतील, ती खरेदी करणे टाळा.
वांगी ताजी आहे की, नाही हे ठरवण्यासाठी तिच्या देठाचाही उपयोग होऊ शकतो. ताज्या वांग्याचा देठ आणि वरचा भाग (टोकदार भाग) चमकदार हिरवा, टणक आणि निरोगी असावा. त्यात थोडा ओलावाही असावा आणि ती सुरकुतलेली दिसू नयेत. जर देठ तपकिरी, सुरकुतलेला, सहज तुटणारा किंवा खूप कोरडा दिसत असेल. तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, वांगी खूप आधीच तोडली गेली आहेत आणि त्यांचा ताजेपणा निघून गेला आहे.
तुम्ही मोठी वांगी खरेदी करावीत का?
लहान ते मध्यम आकाराची वांगी साधारणपणे खूप मोठ्या वांग्यांपेक्षा मऊ असतात आणि त्यात बिया कमी असू शकतात. पण, खूप मोठी वांगी जास्त पिकलेली असण्याची शक्यता अधिक असते आणि त्यात बिया जास्त असू शकतात. अशा जुन्या वांग्यांना कापल्यावर, त्यातील बिया गडद किंवा तपकिरी दिसू शकतात आणि गर स्पंजसारखा वाटू शकतो.
वांगी कडू का लागतात?
मोठी वांगी चांगली असतात हे नेहमीच खरे नसते. मध्यम आकाराची, टणक आणि गुळगुळीत, चमकदार साल असलेली वांगी निवडणे चांगले. अशा वांग्यांचा गर मऊ, बिया कमी आणि चव सौम्य असण्याची शक्यता जास्त असते.
सुरकुत्या आणि तपकिरी डाग
वांग्यांवरील सुरकुत्या, तपकिरी डाग आणि निस्तेज साल ही अनेकदा वांगी जुनी होत असल्याची आणि त्यांचा दर्जा पूर्वीसारखा राहिलेला नाही याची चिन्हे असतात. ताजी वांगी चमकदार आणि गुळगुळीत असतात. वांगी जसजशी जुनी होतात, तसतशी त्यांची साल निस्तेज आणि कमी चमकदार दिसतात. पण, किरकोळ डाग किंवा खुणा याचा अर्थ असा नाही की, ते वांग खाण्यासाठी अयोग्य आहे.
वांगी खरेदी करण्याची योग्य पद्धत
वांगी जर जास्तच मऊ किंवा लगदा झालेली असतील. त्यांना खोल काप, भेगा, बुरशी, किड्यांची स्पष्ट दिसणारी छिद्रे असतील, त्यातून पाणी किंवा द्रव पाझरत असेल किंवा दुर्गंध येत असेल, तर ती खरेदी करू नयेत. ही सर्व वांगी खराब झाल्याची आणि निकृष्ट दर्जाची लक्षणे असू शकतात. त्याचप्रमाणे, वांग्यावर जास्त सुरकुत्या, रंगात लक्षणीय बदल, काळे डाग आणि पूर्णपणे वाळलेले देठ असल्यास, ते वांगी खूप जुनी आणि शिळी असल्याचे लक्षण असू शकतात. नेहमी टणक, स्वच्छ, चमकदार रंगाचे आणि ताजे, हिरवे देठ असलेले वांगेच निवडावे.
