Smoking & Kidney Failure : धूम्रपान ही आरोग्यासाठी सर्वांत हानिकारक सवय आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण ते फुप्फुसांसाठी सर्वांत हानिकारक मानले जाते. त्यामुळे धाप लागणे, दम्याचा झटका येणे, फुप्फुसांचा कर्करोग यासांरखे गंभीर आजार होऊ शकतात.

सिगारेटमुळे होणारे गंभीर परिणाम केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, त्याच्या धुरातील हजारो रसायने श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात आणि रक्तप्रवाहाद्वारे विविध अवयवांपर्यंत पोहोचतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), तंबाखू शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात, फुप्फुसांचे आजार, प्रजनन क्षमता कमी होणे आणि अकाली मृत्यू होणे अशा आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे याचा मूत्रपिंडांवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच सिगारेट ओढणाऱ्यांना मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका जास्त असतो.

धूम्रपानाचा मूत्रपिंडांवर कसा परिणाम होतो?

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, मूत्रपिंडे केवळ मूत्र तयार करण्याचेच काम करीत नाहीत, तर रक्त गाळणे, शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे यांसाठीही त्यांची मदत मिळत असते. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो आणि त्याचा मूत्रपिंडांकडे होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो.

सिगारेटमुळे होणारी हानी एका अवयवापासून सुरू होऊन संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या आणि अवयवांवर परिणाम करू शकते. हृदय आणि मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. एवढेच नाही तर, धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका, शारीरिक प्रतिकारशक्ती, तोंड आणि हिरड्यांचे आरोग्य, प्रजनन क्षमता आणि हाडांवरही परिणाम होतो.

निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याशिवाय, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, निकोटीनमुळे मूत्रपिंडातील रक्तप्रवाह आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेटमध्येही तात्पुरती घट होते. धूम्रपानामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाहक प्रक्रियादेखील वाढतात, ज्यामुळे मूत्रपिंडांची रचना आणि कार्यावरही परिणाम होऊ शकतो.

अनेक अभ्यासांमधून धूम्रपान आणि दीर्घकालीन मूत्रपिंडांच्या आजाराचा संबंध आढळून आला आहे. जर तुम्हाला आधीपासूनच उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल आणि तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर तुमचा धोका आणखी वाढू शकतो.

रक्तवाहिन्यांच्या समस्या:

सिगारेटमुळे मूत्रपिंडांचे होणारे नुकसान समजून घेण्यासाठी धूम्रपानाचा रक्तवाहिन्यांवर होणारा दुष्परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सिगारेटचा धूर शरीरातील अशा प्रक्रियांना चालना देतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाचे नुकसान होऊ शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, धूम्रपानामुळे रक्त अधिक घट्ट होते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही वाढू शकतो.

हे बदल केवळ मूत्रपिंडांपुरते मर्यादित राहत नाहीत. मूत्रपिंडांना पुरेसे रक्त आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यामुळे रक्तवाहिन्यांवरील दीर्घकालीन दाब आणि बिघडलेले कार्य यांमुळे मूत्रपिंडांना सामान्यपणे कार्य करणे कठीण होऊ शकते.

धूम्रपानामुळे आणखी कोणत्या समस्या उद्भवतात?

धूम्रपानामुळे जेव्हा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम हृदय आणि मेंदूवर होतो. सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत धूम्रपानामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका अंदाजे दोन ते चार पटीने वाढतो. धूम्रपानामुळे ट्रायग्लिसराइड्स आणि वाईट कोलेस्ट्रॉलदेखील वाढते, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढू शकतो.

सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, धूम्रपानामुळे फुप्फुसांचा कर्करोग होतो; परंतु अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तंबाखूमुळे २० पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. तंबाखूच्या धुरामध्ये ७,००० पेक्षा जास्त रसायने असतात. त्यांपैकी किमान २५० रसायने विषारी किंवा कर्करोगास कारणीभूत असल्याचे ज्ञात आहे.