रेडमी नोट ३ च्या यशानंतर ‘शिओमी’ने रेडमी नोट फोर लाँच केला आहे. स्वस्त, सुंदर, टिकाऊ या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून शिओमीने ‘रेडमी नोट थ्री’ची पुढची आवृत्ती ‘रेडमी नोट फोर’ भारतात आणली आहे. भारतीय बाजारपेठेत या वर्षी सुमारे ७० लाख हँडसेटची विक्री करण्याचा शिओमीचा मानस आहे. जर तुम्हालाही रेडमी नोट फोर खरेदी करायचा आहे तर आज चांगली संधी आहे कारण आज बारा वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि Mi.com. वर हा फोन सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

यात ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला आहे. ‘रेडमी नोट फोर’चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टू जीबी – थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी, फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असे तीन प्रकार निवडू शकता. हा मोबाइल पूर्णपणे मेटलचा बनविण्यात आला आहे. शिओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ६२५ ऑक्टा कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ५०६ हा जीपीयू वापरला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील गेम्स अधिक चांगल्या प्रकारे आणि विनाअडथळा खेळू शकता तसेच नेहमीच्या वापरातील लहान, मोठे अ‍ॅपसुद्धा सहज वापरू शकता. या प्रोसेसरचे वैशिष्टय़े असे की हा खूप कमी वीज वापरतो, ज्यामुळे कमी बॅटरीचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर अधिक काळ करू शकता. शिवाय यात ४१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर एक ते दीड दिवस सहज वापरू शकता. ‘रेडमी नोट फोर’मध्ये दोन सिम कार्डची सुविधा आहे. परंतु एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. ‘रेडमी नोट फोर’मधे मागील बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार मागच्या आवृत्तीपेक्षा यामध्ये कॅमेरा आणखी सुधारित केला आहे आणि पुढील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा उपयोग तुम्ही सेल्फी काढण्यासाठी किंवा व्हिडीओ कॉल करण्यासाठी करू शकता.

वाचा : जाणून घ्या ‘रेडमी नोट फोर’ची वैशिष्ट्ये

फ्लिपकार्टवर अॅक्सिसच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास ५ टक्के सूट देण्यात आली आहे. तर ६३१ च्या इएमआयवर हा फोन उपलब्ध आहेत.

मोबाइल किंमत :
टू जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी रु. ०९,९९९/-थ्री जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी रु. १०,९९९/-फोर जीबी रॅम/ ६४ जीबी मेमरी रु. १२,९९९/-