Toilet Time What It Reveals About Your Gut Health: दररोज सकाळी उठल्यानंतर अनेक जण सर्वप्रथम शौचाला जातात. काही लोकांचे मलविसर्जन काही मिनिटांत पूर्ण होते, तर काहींना बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहावे लागते. अनेक जण तर हातात मोबाईल घेऊन शौचालयात बसतात आणि कधी १५-२० मिनिटे निघून जातात, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? शौचाला बसण्याची वेळ, मलाची स्थिती आणि मलविसर्जन करताना जाणवणारा त्रास या गोष्टी तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल महत्त्वाचे संकेत देऊ शकतात. मग शौचाला किती वेळ लागणे सामान्य आहे? किती वेळ टॉयलेटमध्ये बसणे टाळावे? जाणून घेऊया.

शौचाला किती मिनिटे लागणे सामान्य आहे?

मलविसर्जनासाठी प्रत्येक व्यक्तीला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो. साधारणपणे काही मिनिटांत शौचास होणे अपेक्षित असते. मात्र, यासाठी सर्वांना लागू होईल अशी ठराविक वेळ नाही. मलविसर्जन सहज होत असेल, जास्त जोर लावावा लागत नसेल आणि पोट साफ झाल्याचे समाधान मिळत असेल तर ही चांगली बाब आहे.

दुसरीकडे, दररोज शौचाला बराच वेळ लागत असेल, मल बाहेर काढण्यासाठी जोर लावावा लागत असेल किंवा शौच पूर्ण न झाल्यासारखे वाटत असेल तर बद्धकोष्ठतेची समस्या असू शकते. काही वेळा आतड्यांची हालचाल मंदावल्यामुळेही असा त्रास होतो, त्यामुळे केवळ वेळ न पाहता मलविसर्जनाच्या सवयींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसण्याची सवय ठरू शकते धोकादायक!

अनेकांना टॉयलेटमध्ये गेल्यानंतर मोबाईल पाहण्याची सवय असते. सुरुवातीला काही मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतला जातो; मात्र सोशल मीडिया पाहताना किंवा व्हिडीओ बघताना बराच वेळ निघून जातो. ही सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

कारण शौचालयात बराच वेळ बसून राहिल्याने गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, त्यामुळे मूळव्याध होण्याचा किंवा आधीपासून असलेला त्रास वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रत्यक्ष शौचास झाल्यानंतर विनाकारण टॉयलेटमध्ये बसून राहू नये. शौचालयाला विश्रांतीची जागा किंवा मोबाईल पाहण्याचे ठिकाण बनवणे टाळावे.

सकाळी उठल्यानंतर शौचाला का होते?

आपल्या पचनसंस्थेचे कार्य शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळानुसार सुरू असते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर अनेकांना शौचास जाण्याची इच्छा होते. यामागे गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स ही नैसर्गिक प्रक्रिया कार्यरत असते.

जेवण पोटात गेल्यानंतर मोठ्या आतड्यांची हालचाल वाढते आणि मलविसर्जनाची इच्छा निर्माण होऊ शकते. मात्र, शौचास जाण्याची इच्छा वारंवार दाबून ठेवल्यास कालांतराने मलविसर्जनाच्या नियमित सवयीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये.

मलाची रचना सांगते पचनसंस्थेची स्थिती!

तुमच्या मलाचा रंग, आकार आणि मऊपणा यावरूनही पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल काही संकेत मिळू शकतात.

१. मल कडक आणि कोरडा असणे : मल खूप कडक, कोरडा किंवा लहान गोळ्यांसारखा होत असेल तर बद्धकोष्ठतेची समस्या असू शकते. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असणे आणि पुरेसे पाणी न पिणे ही त्यामागील काही कारणे असू शकतात.

२. मल मऊ आणि सहज बाहेर पडणे : मल सहज बाहेर पडत असेल, त्यासाठी जास्त जोर लावावा लागत नसेल, तर हे सामान्य मलविसर्जनाचे लक्षण आहे.

३. मल खूप पातळ असणे : वारंवार जुलाब होणे किंवा मल खूप पातळ होणे हे संसर्ग, आहारातील बदल किंवा पचनसंस्थेतील समस्यांमुळे होऊ शकते.

४. मलविसर्जनाच्या सवयी अचानक बदलणे : अचानक बद्धकोष्ठता सुरू होणे, वारंवार जुलाब होणे किंवा मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल होणे याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS), थायरॉईडचे विकार किंवा आतड्यांशी संबंधित इतर समस्यांमुळे असे होऊ शकते.

कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे?

शौचाला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, मल खूप कडक होत असेल किंवा वारंवार जोर लावावा लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मलातून रक्त येणे, अचानक वजन कमी होणे, पोटात सतत दुखणे किंवा मलविसर्जनाच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे अशी लक्षणे दिसल्यास तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

लक्षात ठेवा, काही व्यक्ती दिवसातून एकदा शौचाला जातात, तर काही व्यक्तींना दिवसातून दोनदा किंवा दर दोन दिवसांनी शौचास होते. दिवसातून तीन वेळांपासून आठवड्यातून तीन वेळांपर्यंत मलविसर्जन होणे सामान्य मर्यादेत असू शकते. मल सहज बाहेर पडणे आणि पोट साफ झाल्याचे समाधान मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.

(महत्त्वाची सूचना : या लेखातील माहिती सामान्य आरोग्यविषयक जागरूकतेसाठी आहे. कोणताही त्रास सातत्याने जाणवत असल्यास किंवा मलविसर्जनाच्या सवयींमध्ये अचानक बदल झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही सकाळी शौचाला बसल्यानंतर किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या सवयी सांगतात पचनसंस्थेचं आरोग्य!)