पोटाच्या कर्करोगावर टोमॅटोचा अर्क गुणकारी

या टोमॅटोमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते व त्यांच्या वाढीस अटकाव होतो.

tomato
गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत पोहोचला होता
टोमॅटोत कर्करोगविरोधी गुण असतात. हे तर खरेच पण आता त्याबाबत नवे संशोधन झाले असून टोमॅटोचा अर्क हा पोटाच्या कर्करोगाला अटकाव करतो, असे निष्पन्न झाले आहे. संपूर्ण टोमॅटोचा अर्क यात गुणकारी ठरतो. अमेरिका व इटलीतील वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले असून त्यात टोमॅटोच्या सॅन मारझानो व कोरबारिनो या प्रजातींचा वापर करण्यात आला. या टोमॅटोमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखली जाते व त्यांच्या वाढीस अटकाव होतो. साब्रो इन्स्टिटय़ूट ऑफ मॉलिक्युलर मेडिसीनचे प्रा. अँटानिओ गिओरदानो व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले हे संशोधन सेल्युलर बायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते त्या देशात पोटाच्या कर्करोगाचे दरवर्षी २८ हजार रुग्ण आढळतात. आतडय़ाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग हे साठ टक्के प्रौढांत दिसून येतात, तर ६५ टक्के प्रमाणात वृद्धांमध्ये दिसून येतात. आधीच्या अभ्यासानुसार टोमॅटोतील लायकोपिन हे कॅरेटेनॉइड टोमॅटोला लाल रंग आणीत असते. त्यामुळे कर्करोगाशी सामनाही करता येतो. प्रा. गिओरदानो व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोमॅटोचे कर्करोगविरोधी गुणधर्म तपासले असून टोमॅटोच्या अर्काने कर्करोग पेशी मरतात, असे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर कर्करोगाच्या गाठीपासून काही पेशी दूर जात कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करतात. इटलीच्या ऑनकॉलॉजी रीसर्च सेंटर ऑफ मेरकोग्लिआनो येथील डॅनिएला बॅरोन हे या संशोधनाचे सहलेखक आहेत. टोमॅटोतील काही पोषकांचा कर्करोगावर उपयोग होतो, पण त्यावर आणखी संशोधनाची गरज आहे, असे गिओरदानो यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tomato extracts helpful on stomach cancer