नियमित टोमॅटो खाल्ल्याने त्वचेचा कर्करोग होण्यापासून बचाव होत असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या संशोधनामध्ये आढळून आले आहे. नर उंदराला टोमॅटोची पावडर खाण्यास दिल्यामुळे त्याला होणाऱ्या त्वचेच्या कर्करोगामध्ये निम्म्याने घट दिसून आली.

अमेरिकेच्या आहिओ स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी नर उंदराला देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये नियमित ३५ आठवडे १० टक्के टोमॅटो पावडरचा समावेश करण्यात आला. त्यानंतर या उंदराच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. अन्नामध्ये टोमॅटोचा समावेश नसलेल्या उंदराच्या तुलनेत अन्नामध्ये टोमॅटोचा समावेश असणाऱ्या उंदरामध्ये त्वचेचा कर्करोग होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधकांना आढळून आले.

टोमॅटो आणि कर्करोग यांचा परस्परसंबंध आहे. टोमॅटोमध्ये असलेल्या रंगद्रव्यामुळे (पिगमेंट) त्याला रंग येतो. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून (यूव्ही लाइट)  हा रंग त्वचेचे संरक्षण करतो. सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून  त्वचेचा कर्करोग होतो. मात्र टोमॅटो खाल्ल्याने त्यापासून आपला बचाव होण्यास मदत होत असल्याचे, जेसिका कॉपरस्टोन यांनी म्हटले आहे.