Brain Tumor Symptoms And Causes :अनेकदा डोकेदुखी होण्याचे कारण आपण थकवा किंवा तणाव समजतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, कधीकधी ही वरवर सामान्य वाटणारी वेदना शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असलेल्या मेंदूवर परिणाम करते. काहीवेळा ही ब्रेन ट्यूमरचीही लक्षण असतात. ब्रेन ट्यूमर हा असा एक आजार आहे, ज्याचे नाव ऐकताच मनात भीती निर्माण होते. जर सुरुवातीच्या लक्षणांवरून त्याचे निदान झाले, तर योग्य उपचाराने रुग्णाचा जीव वाचवता येतो.
गुडगाव येथील मणिपाल रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. पुनीतकांत अरोरा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, जेव्हा मेंदूच्या पेशींमधील डीएनए बदलतो, तेव्हा या पेशी सामान्य नियंत्रण गमावतात आणि अनियंत्रितपणे वाढू लागतात. या असामान्य वाढीमुळे मेंदूच्या गाठी (ट्यूमर) तयार होतात. मेंदूच्या गाठींची नेमकी कारणे अद्याप पूर्णपणे समजलेली नसली तरी अनुवांशिक बदल आणि काही पर्यावरणीय घटक ही संभाव्य कारणे मानली जातात.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा डोकेदुखी किंवा अशक्तपणा यांसारख्या सामान्य समस्यांसारखीच असू शकतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे लवकर ओळखल्यास अधिक प्रभावीपणे उपचार करता येतात. पण, ब्रेन ट्यूमरची सामान्य लक्षणं कोणती आणि या आजाराचा जास्त धोका कोणाला असतो याबद्दल जाणून घेऊया.
ब्रेन ट्यूमरची लक्षणे
१) सतत किंवा हळूहळू वाढणारी डोकेदुखी.
२) सकाळी तीव्र डोकेदुखी किंवा जडपणा जाणवणे.
३) कोणत्याही कारणाशिवाय वारंवार उलट्या होणे किंवा मळमळ होणे.
४) अंधूक दिसणे, डबल दिसणे किंवा नजर कमजोर होणे.
५) बोलण्यात, समजण्यात किंवा लक्षात ठेवण्यात अडचण.
६) शरीराच्या कोणत्याही भागात अशक्तपणा किंवा बधिरता जाणवणे.
७) चालताना तोल जाणे किंवा चक्कर येणे.
८) वारंवार झटके येणे.
९) वर्तनात किंवा व्यक्तिमत्त्वात अचानक बदल.
१०) ऐकण्याची समस्या किंवा कानात आवाज येणे.
ट्यूमर कसा तयार होतो आणि त्याचे किती प्रकार आहेत?
ट्यूमर म्हणजे असामान्य पेशींचा एक समूह, जो कोणत्याही अवयवात किंवा उतीमध्ये विकसित होऊ शकतो. जेव्हा शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि सामान्य पद्धतींचे पालन करत नाहीत, तेव्हा ट्यूमर तयार होतो. ट्यूमरचे दोन मुख्य प्रकार आहेत: बेनाइन आणि मॅलिग्नेंट. बेनाइन ट्यूमर सहसा कर्करोग नसलेले असतात, हळूहळू वाढतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाहीत. मॅलिग्नेंट ट्यूमर हा कर्करोगाचा ट्यूमर असतो, जो वेगाने वाढतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये तो पसरण्याचा धोका असतो. ट्यूमरचा परिणाम त्याच्या आकार, स्थान आणि प्रकारावर अवलंबून असतो, जो शरीराच्या सामान्य कार्यावर परिणाम करू शकतो.
कोणत्या लोकांना ब्रेन ट्यूमरचा धोका जास्त असतो?
मेंदूच्या गाठी कोणत्याही वयात होऊ शकतात, परंतु काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, ज्यांच्या कुटुंबात हा आजार आहे, जे जास्त किरणोत्सर्गाच्या संपर्कात आले आहेत, ज्यांचे वय जास्त आहे, जे हानिकारक रसायनांच्या संपर्कात आले आहेत आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना ब्रेन ट्यूमर होण्याचा धोका अधिक असतो.
ब्रेन ट्यूमरपासून कसे संरक्षण करावे?
१) ब्रेन ट्यूमरला पूर्णपणे प्रतिबंध करण्याचे कोणतेही प्रभावी उपाय नाहीत, परंतु योग्य जीवनशैली आणि काही खबरदारी अवलंबून त्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.
२) गरज नसताना वारंवार एक्स-रे किंवा सीटी स्कॅन करणे टाळा. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वैद्यकीय तपासणी करून घ्या.
३) कीटकनाशके, औद्योगिक रसायने आणि विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे टाळा.
४) आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करा. आपल्या आहारात फळे, भाज्या आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करा.
५) दररोजच्या शारीरिक हालचालींमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
६) पुरेशी झोप घ्या आणि तणावावर नियंत्रण ठेवा.
७) जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे किंवा दृष्टीमध्ये बदल यांसारखी लक्षणे दिसल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
८) विशेषतः जर कुटुंबात ट्यूमर किंवा कर्करोगाचा इतिहास असेल तर नियमित आरोग्य तपासणी करून घ्या.
९) वेळीच काळजी घेणे आणि लवकर निदान करणे हा या आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
