जर तुम्हाला काही दिवसांपासून सतत पाठदुखीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सततची पाठदुखी हे विविध अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. नवी दिल्ली येथील बीएलके मॅक्स हॉस्पिटलचे प्रधान संचालक, प्रमुख व ऑर्थो स्पाइन सर्जन डॉ. पुनीत गिरधर यांनी, दीर्घकालीन पाठदुखीमुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो आणि त्यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतात, हे स्पष्ट केले आहे.

दीर्घकाळ टिकणाऱ्या पाठदुखीची कारणे

स्नायू किंवा अस्थिबंधांवर ताण : जड वस्तू उचलल्याने, अचानक अवघड हालचाली केल्याने किंवा पडल्याने पाठीच्या स्नायूंवर आणि मणक्याच्या अस्थिबंधांवर ताण येऊ शकतो. जर तुमची शारीरिक स्थिती चांगली नसेल, तर पाठीवर सतत ताण आल्याने स्नायूंचे आकुंचन होऊन वेदनादायी अनुभूती मिळू शकते.

डिस्क फुगणे: तुमच्या मणक्यातील डिस्क हाडांमध्ये उशीसारखे काम करतात. कधी कधी डिस्कच्या आतील मऊ पदार्थ बाहेर फुगतो किंवा फाटतो आणि मज्जातंतूवर दाब टाकतो, ज्यामुळे वेदना होतात.

ऑस्टियोआर्थरायटिस: ऑस्टियोआर्थरायटिसचा परिणाम पाठीच्या खालच्या भागावर होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, मणक्यातील संधिवातामुळे मज्जारज्जूभोवतीची जागा अरुंद होऊ शकते, या स्थितीला स्पायनल स्टेनोसिस, असे म्हणतात.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

जास्त वजनामुळे तुमच्या पाठीच्या स्नायूंवर दाब येतो. जर तुमचे वजन जास्त असेल, तर वजन कमी केल्याने पाठदुखी टाळता येते, म्हणून दररोज व्यायाम करा. अॅरोबिक व्यायामांमुळे तुमच्या पाठीची ताकद वाढते आणि स्नायूंना अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत होते. म्हणून तुमच्या पोटाच्या स्नायूंना (कोर मसल्स) मजबूत करणाऱ्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करा.

डॉक्टरकडे कधी जावे?

जर तुम्हाला तीव्र पाठदुखी असेल, जी विश्रांतीने कमी होत नसेल. वेदना एका किंवा दोन्ही पायांमध्ये खाली पसरत असेल, विशेषतः जर ती गुडघ्याच्या खाली जात असेल. वेदनेसोबत एका किंवा दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा, बधिरता किंवा मुंग्या येणे असा त्रास जाणवत असेल. वेदनेसोबत कोणतेही कारण नसताना वजन कमी होत असेल. वेदनेसोबत मूत्राशय किंवा आतड्यांसंबंधीच्याही समस्यांनाही सामोरे जावे लागत असेल.