Foot Pain Remedy: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोपताना अनेकांचे पाय दुखू लागतात. कधी पायांच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होतात, तर कधी तळपाय, टाचा किंवा गुडघ्यांच्या आसपास दुखू लागते. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणं, सतत उभं राहणं, जास्त चालणं, शारीरिक श्रम करणं किंवा शरीराला पुरेशी विश्रांती न मिळणं यांमुळे पायांवर ताण येऊ शकतो. परिणामी, रात्री झोपण्याच्या वेळी पायांमधील वेदना अधिक जाणवू शकतात आणि झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. दिवसभराच्या कामानंतर रात्री पाय खूप दुखत असतील, तर काही लोक मिठाच्या थरावर उभे राहून पाय घासण्याचा घरगुती उपाय करतात. त्यामुळे पायांना आराम मिळतो.
काय करावे?
- सर्वप्रथम एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या कापडावर किंवा मॅटवर मिठाची जाडसर परत पसरवून घ्या.
- परंतु, यासाठी एप्सम सॉल्टचा वापर करायचा आहे.
- आता आपले पायदेखील स्वच्छ धुऊन व्यवस्थित कोरडे करून घ्या.
- त्यानंतर मिठावर उभे राहून हळूहळू चाला किंवा पाय एप्सम सॉल्टवर हलकेच घासा.
- सुमारे १० मिनिटे असे केल्यानंतर पुन्हा एकदा पाय स्वच्छ धुऊन घ्या.
मिठावर पाय घासल्याने काय होते?
हा सोपा उपाय केल्याने शरीराला आराम मिळाल्यासारखे वाटू शकते. एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियम हे शरीरातील स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाचे खनिज आहे. त्यावर पाय घासल्याने मॅग्नेशियम त्वचेतून पुरेशा प्रमाणात शोषले जाते आणि त्यामुळे थकवा किंवा स्नायूंच्या वेदना कमी होतात.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
पायांवर उघडी जखम असेल, मधुमेह असेल किंवा वारंवार संसर्ग होत असेल, तर हा उपाय टाळावा. मिठावर चालल्याने पायांच्या त्वचेला घर्षण होऊन त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाय दुखत असल्यास आरामदायी पद्धतींचा अवलंब करावा. हा उपाय शरीराला आराम मिळवून देण्यासाठी केला जात असला तरी झोपेचा त्रास सतत होत असेल किंवा रात्री पाय वारंवार दुखत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
‘हे’ उपायही करू शकता
कोमट पाण्याने पायांना शेक द्या
दिवसभराच्या कामामुळे पायांचे स्नायू थकले असतील, तर कोमट पाण्याने शेक दिल्याने काही प्रमाणात आराम मिळू शकतो. एका टबमध्ये आरामदायी कोमट पाणी घेऊन, त्यात पाय काही वेळ ठेवता येतात. पाणी खूप गरम नसावे.
पायांना हलक्या हाताने मसाज करा
पायांच्या स्नायूंमध्ये थकवा जाणवत असल्यास तळपाय आणि पोटरीला हलक्या हाताने मसाज करता येतो. त्यामुळे काही जणांना आराम मिळतो.
पाय थोडे उंचावर ठेवून झोपा
दिवसभर उभे राहिल्यानंतर पाय जड वाटत असतील, तर झोपताना पायांखाली उशी ठेवून त्यांना थोडे उंचावर ठेवता येते. विशेषतः किरकोळ सूज असल्यास यामुळे आराम मिळू शकतो.
