How to Stop Sneezing Instantly: शिंक येणे ही शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे. नाकात धूळ, परागकण किंवा एखादी सूक्ष्म वस्तू गेली, नाक नीट साफ न झाल्यास, सर्दी-खोकला, अॅलर्जी किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला, तर शिंक येणं साहजिक आहे. मात्र, काही वेळा ही शिंक इतकी वारंवार येते की, ती त्रासदायक ठरते. सतत शिंका येत राहिल्याने कामावर लक्ष लागत नाही, डोकं जड होतं आणि अस्वस्थ वाटू लागतं. अशा वेळी शिंका लवकर थांबाव्यात यासाठी उपाय शोधणं गरजेचं ठरतं.
याच समस्येवर आचार्य बालकृष्ण यांनी आयुर्वेदात सांगितलेला एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय सुचवला आहे. विशेष बाब म्हणजे हा उपाय तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या एका पानाद्वारे करता येतो.
शिंका थांबवण्यासाठी ‘हे’ पान उपयुक्त
आचार्य बालकृष्ण यांच्या मते, सतत शिंका येत असल्यास तमालपत्राचे पाणी उपयुक्त ठरू शकते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात, जे श्वसनमार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करतात.
हा उपाय करण्यासाठी काही तमालपत्रे घ्या आणि ती पाण्यात उकळून, त्यांचा काढा तयार करा. हा काढा कोमट असताना नियमितपणे प्या. काही दिवसांतच शिंका येण्याची तक्रार कमी होऊ शकते, असा आयुर्वेदाचा अनुभव आहे.
शिंका तत्काळ थांबवण्यासाठी ‘हे’ सोपे उपायही ठरू शकतात उपयुक्त
- जीभ वरच्या टाळ्याला दाबून घासल्यास मेंदूला शिंका थांबविण्याचा संकेत मिळतो
- नाकाच्या वरच्या भागावर हलक्या हाताने चोळल्यास शिंक येण्याची तीव्रता कमी होते
- वरचा ओठ अंगठा आणि बोटाने हलक्या दाबाने पकडल्यास शिंक थांबण्यास मदत होते
- नाक नीट आणि स्वच्छ ठेवल्यास वारंवार शिंका येण्याचा त्रास कमी होतो
हे घरगुती उपायही ठरू शकतात फायदेशीर
- आले आणि मध : आले आणि मध यांचे मिश्रण श्वसनमार्गातील सूज कमी करते. त्यामुळे शिंका येण्याचा त्रास आटोक्यात येऊ शकतो.
- वाफ घेणे : गरम पाण्याची वाफ घेतल्यास किंवा गरम पाण्यात पुदिन्याचे तेल घालून, त्याचा वाफारा घेतल्यासही श्वसनमार्ग मोकळा होतो.
- आवळा : ‘क’जीवनसत्त्वाने समृद्ध असलेला आवळा श्वसनाशी संबंधित त्रास कमी करण्यास मदत करतो.
सलग अनेक वेळा शिंक का येते?
जर एखाद्या व्यक्तीला सलग १० ते २० वेळा शिंक येत असेल, तर त्यामागे अॅलर्जीक नासिकाशोथ, सायनसचा त्रास किंवा सकाळची थंड हवा कारणीभूत असू शकते. अशा वेळी केवळ तात्पुरते उपाय न करता, तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणंही महत्त्वाचं ठरतं.
लहानसा आयुर्वेदिक उपाय आणि योग्य काळजी घेतली, तर सतत शिंक येण्याच्या त्रासातून दिलासा मिळू शकतो.
