scorecardresearch

दमदार आवाजाची हमी

गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात विविध कंपन्या इअरबड्स घेऊन येत आहेत.

दमदार आवाजाची हमी

‘टीडब्ल्यूएस’ इअरबडची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कानात व्य़वस्थितपणे बसू शकणाऱ्या या इअरबड्सच्या माध्यमातून स्टिरिओ ध्वनी निर्माण होत असल्यामुळे त्याला वापरकर्त्यांची पसंती मिळत आहे. ‘साऊंडकोअर’चे ‘आर १००’ इअरबड्सदेखील वापरकर्त्यांच्या पसंतीला उतरणारे आहेत. शिवाय यातून उमटणारा दमदार आवाज आणि दिर्घकाळ टिकणारी बॅटरी या गॅझेटला वरच्या श्रेणीत नेऊन बसवतात.

‘टीडब्ल्यूएस’ म्हणजे ‘ट्र वायरलेस स्टिरिओ’ तंत्रज्ञान. अलिकडे बाजारात येणारे विविध इअरबड्स या तंत्रज्ञानाने सज्ज असतात. या तंत्रज्ञानामुळे तुम्ही दोन्ही इअरबड्स स्वतंत्रपणे कनेक्ट करून ध्वनीचा दुहेरी आनंद घेऊ शकता. सध्या स्मार्टफोनवरून संगीत ऐकण्याचा किंवा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चित्रपट/मालिकांचा आनंद घेण्यासाठी वापरकर्ते वायरलेस हेडसेटचा वापर करू लागले आहेत. हेडसेट म्हटले तरी त्याचा थोडा तरी पसारा आलाच. पुन्हा ते कानावर चपखलपणे बसतीलच, याचीही हमी देता येत नाही. उलट इअरबड्स म्हणजे कर्णछिद्रात व्यवस्थित फिट होणारे गॅझेट. ते कानाच्या आत योग्यपणे बसू शकत असल्यामुळे त्यातून उमटणारा ध्वनी अधिक प्रभावी ठरतो. गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात विविध कंपन्या इअरबड्स घेऊन येत आहेत. या स्पर्धेमुळे इअरबड्स अगदी एक हजार रुपयांपासूनही उपलब्ध होत आहेत. यातच आता भर पडली आहे साऊंडकोअरच्या ‘आर १००’ या टीडब्ल्यूएस इअरबड्सची.

साऊंडकोअरचे हे इअरबड्स एका काळय़ा डबीत मिळतात. साधारण पाच सेमी आकाराच्या या डबीत दोन काळय़ा रंगाचे इअरबड्स उपलब्ध होतात. ही डबी अर्थात केस अतिशय आकर्षक असून खिशातदेखील सहज सामावणारी आहे. सुमारे १९९९ रुपयांत विविध ई कॉमर्स संकेतस्थळांवर हे इअरबड्स उपलब्ध आहेत. त्यावर कंपनीने दीड वर्षांची वॉरंटीही देऊ केली आहे. ‘आर १००’मध्ये ब्लुटुथ ५.० ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या इअरबड्सचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे यातील ‘हॉल सेन्सर’ तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे केसमधून काढताच इअरबड्स आधीच जुळणी झालेल्या (पेअर्ड) उपकरणाशी लगेच कनेक्ट होतात. त्यामुळे प्रत्येकवेळी इअरबड्स कनेक्ट करण्याची वेळ येत नाही. यामुळे इअरबड्च्या बॅटरीत बचत होते. दोन्ही बड्समध्ये दहा एमएम क्षमतेचे डायनॅमिक ड्रायव्हर पुरवण्यात आले असल्याने त्यातून उमटणाऱ्या ध्वनीला बेसची अतिशय चांगली जोड मिळाली आहे. यातील बेस अप तंत्रज्ञान ध्वनीतील सूक्ष्म लहरी टिपून त्याद्वारे बेस कमी अधिक प्रमाणात सादर करते. दोन्ही इअरबड्सना मायक्रोफोनची व्यवस्था असल्याने कोणतेही एक इअरबड वापरून तुम्ही फोन कॉलींगचा आनंदही घेऊ शकता.

‘आर १००’ची डबी सी टाइप चार्जरच्या मदतीने चार्ज करता येते. दहा मिनिटांच्या चार्जवर तुम्ही एक तास प्लेबॅक अनुभवू शकता. तसेच एकदा डबी पूर्ण चार्ज केल्यानंतर त्याद्वारे तुम्ही किमान २० तास प्लेबॅकचा आनंद घेऊ शकता. कंपनीने २५ तासांच्या प्लेबॅकचा दावा केला असला तरी, आम्हाला २० तासांनंतर बॅटरी चार्ज करावी लागली. परंतु, दिवसभर इअरबड्स वापरल्यानंतर तुम्हाला २० तासांचा प्लेबॅक मिळतो. इअरबड्सचा वापर करण्याचा रोजचा कालावधी कमी असेल तर किमान आठवडाभर हे इअरबड्स एका चार्जिगवर टिकू शकतात. दोन्ही इअरबडना रबरी ग्रीपिंग पुरवण्यात आले आहे. त्यामुळे ते कानातून निसटण्याची शक्यता नसते. शिवाय त्यांचा आकारही अतिशय विचारपूर्वक तयार केला असल्यामुळे कानात बसवल्यानंतर उर्वरीत भागही कानाच्या बाभागापेक्षा बाहेर येत नाही.

‘साऊंडकोअर’ आर १०० इअरबड्स रोजच्या वापरासाठी चांगले आहेतच. जॉगिंगला किंवा फेरफटका मारायला जाताना हे इअरबड्स वापरण्यास योग्य आहेतच; शिवाय दैनंदिन काम करत असताना संगीताचा आनंद घ्यायचा असेल तरीही ते उपयुक्त ठरतात. यात ‘नॉइज कॅन्सलेशन’ची सुविधा मात्र नाही. परंतु यातील तंत्रज्ञान सभोवतालच्या ध्वनींपेक्षा अधिक प्रभावीपणे ध्वनीचा अनुभव देते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Truly wireless earphones tws earphones zws

ताज्या बातम्या