scorecardresearch

यंदाच्या पावसाळयात मक्याची भजी होऊन जाऊ द्या! ट्राय करा शेफ संजीव कपूर यांची रेसिपी

सॅन्डविचपासून पिझ्झापर्यंत अशा एक ना अनेक पदार्थांमध्ये मका वापरला जातो. पण मक्याच्या भजीची खमंग चव या सगळ्या पदार्थांहून निराळी आणि वरचढ ठरते.

यंदाच्या पावसाळयात मक्याची भजी होऊन जाऊ द्या! ट्राय करा शेफ संजीव कपूर यांची रेसिपी
आम्ही आज तुमच्यासाठी खास शेफ संजीव कपूर यांच्या 'कॉर्न भजी'ची रेसिपी घेऊन आलो आहोत. (Photo : Indian Express)

पावसाळा आणि मका ही जोडी अतूट! नाही का? मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला उभं राहून खरपूस मका खाण्याचं सुख कुठेच मिळायचं आहे. पावसाळा आपल्याला खरंतर अशीच अनेक भन्नाट कॉम्बिनेशन्स देऊन जातो. म्हणजे उदा. पाऊस आणि चहा किंवा पाऊस, चहा आणि भजी किंवा मग पाऊस, चहा आणि मक्याची भजी? खरंतर मक्याच्या दाण्यांपासून अनेक उत्कृष्ट पदार्थ बनतात. अगदी सॅन्डविचपासून पिझ्झापर्यंत अशा एक ना अनेक पदार्थांमध्ये मका वापरला जातो. पण मक्याच्या भजीची खमंग चव या सगळ्या पदार्थांहून निराळी आणि वरचढ ठरते. म्हणूनच यंदाच्या पावसाळ्यात एका रम्य संध्याकाळी घरात मक्याची भजी होऊनच जाऊ द्या. याचसाठी आम्ही आज खास शेफ संजीव कपूर यांच्या कॉर्न भजीची ही रेसिपी घेऊन आलो आहोत. तर जाणून घेऊया खमंग मक्याच्या भजी बनवण्याची ही साधी सोपी कृती

साहित्य :

 • १ भाजलेला मका
 • तेल
 • २ कांदे लहान
 • ६ ते ८ धणे
 • १/२ कप बेसन
 • १/२ टीस्पून हळद
 • १/२ टीस्पून लाल तिखट
 • १/२ टीस्पून जिरे पावडर
 • १/२ टीस्पून धणे पावडर
 • चवीनुसार मीठ
 • ओवा १/४ टीस्पून
 • बेकिंग सोडा एक चिमूटभर
 • सर्व्ह करण्यासाठी टोमॅटो केचप
 • सर्व्ह करण्यासाठी हिरवी चटणी

कृती :

मक्याचे सर्व दाणे काढून घ्या आणि व्यवस्थित वेगळे करा. एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवा. आता दुसऱ्या एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा आणि धणे घाला मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात बेसन, हळद पावडर, तिखट, जिरे पूड, धणे पूड, मीठ, ओवा आणि बेकिंग सोडा घाला. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करा. त्यात ३ ते ४ चमचे पाणी घाला आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

मिश्रण होईपर्यंत तुमचं तेल व्यवस्थित तापेल. आता आपल्या हातानी किंवा चमचा वापरून हे मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणात घ्या आणि गरम तेलात हळुवार सोडा. कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. कढईतून काढल्यानंतर खरपूस तळलेल्या या भज्या किचन टॉवेलवर ठेवा. जेणेकरून त्यातील जास्तीचं तेल निघून जाईल.

आता या खमंग कॉर्न भज्या टोमॅटो केचअप आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. यासोबत वाफाळत्या चहाचा कप तुम्ही विसरणार नाही! ह्याची आम्हाला खात्री आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या