Benefits of eating papad: एकेकाळी एप्रिल-मे महिन्यांमध्ये प्रत्येक भारतीय घरात पापड बनवण्याची घाई असायची. मात्र, आता बदलत्या जीवनशैलीमुळे घरी पापड बनवण्याची कला लुप्त होत चालली आहे. हल्ली आपण सगळेच थेट दुकानातून पापड आणतो. आपल्या देशातील कित्येक भागांत दररोज न चुकता, शाकाहारी पदार्थांसोबत पापड खाण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची विविधता आहे – दक्षिण भारतीय तांदळाचे पापड, राजस्थानचे खिचिया पापड किंवा पंजाबी उडीद डाळीचे पापड. म्हणजे लोणचे आणि पापड हे आपण साईड डिश म्हणून खातो. त्यामुळे जेवणाची मजा दुप्पट होते. पण, फक्त चवीसाठी खाल्ले जाणारे हे पापड आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

भारतीय खाद्यसंस्कृतीत लोणची, चटण्या, रायता आणि पापड हे मुख्य जेवणासोबत दिले जातात. ते केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच दिले जात नाहीत, तर त्यांचा संबंध आपल्या आरोग्याशीही आहे. दही आणि लोणचे आतड्यातील निरोगी जीवाणू वाढवण्यास मदत करतात; तर चटणी पोटाला थंडावा देते आणि पापड पचनसंस्था निरोगी ठेवतात. जेवणासोबत पापड खाण्याची परंपरा खूप जुनी आहे. पापड खाण्याचे इतर कोणते आरोग्यदायी फायदे आहेत आणि ते योग्य प्रकारे कसे खावेत, याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेऊ…

पापड कसा बनवला जातो?

  • पापड सहसा मूग आणि उडीद डाळीपासून बनवला जातो. या डाळी रात्रभर पाण्यात भिजवून,नंतर त्यांची बारीक पूड केली जाते.
  • ओवा , हिंग, काळी मिरी पूड व पापडखार हे चार घटक बहुतेक पापडांमध्ये आढळतात, जे केवळ चवच नाही, तर त्याचे फायदेही वाढवतात.

पापडाचे फायदे

  • ओवा, काळी मिरी, हिंग, पापडखार हे पापडात वापरले जाणारे घटक पचनक्रिया सुलभ करण्यास मदत करतात आणि गॅस, आम्लपित्त व पोटफुगी यांसारख्या समस्यांनाही दूर ठेवतात.
  • पापड हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर तुम्ही त्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. त्यामुळे पोट भरते आणि उष्मांक वाढत नाहीत.
  • जर तुम्हाला मळमळण्याचा त्रास होत असेल, तर पापड खाल्ल्याने या त्रासापासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.

पापड खाण्याची योग्य पद्धत

तुम्ही पापडाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतले आहेत; पण हे फायदे मिळवण्यासाठी तो योग्य प्रकारे खाणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कधीतरी पापड खात असाल, तर तो तळायला काही हरकत नाही; पण जर तुम्ही तो वारंवार खात असाल, तर तो भाजून खाणे उत्तम ठरेल.