भजी हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पाऊस पडत असताना गरम गरम चहा आणि भजी हे कोणाला नाही आवडत. भाज्या, मसाले आणि पिठाला मिक्स करून तळून हा पदार्थ बनवला जातो. आजच्या हेल्दी लाइफस्टाइलकडे वळण्याच्या ट्रेण्डमुळे अनेकजण आता असे तळलेले पदार्थ खाऊ शकत नाहीत. ते नेहमीच हेल्दी पदार्थांच्या शोधात असतात. म्हणूनच खाद्यपदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्ये, साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. शालिनी रजनी यांनी त्यांच्या क्रेझी कडची (crazykadchi) या इन्स्टाग्रॅम पेजवरून हेल्दी भजीची रेसिपी पोस्ट केली आहे. शालिनी या मिलेट्स कोच आहेत आणि त्या सर्व वयोगटातील लोकांसाठी मिलेट्स कुकिंगच्या कार्यशाळाही घेतात.

साहित्य

५ टेबल स्पून – नाचणी पीठ
२ टिस्पून- बर्नयार्ड मिलेट्स पीठ किंवा तांदळाच पीठ
१ मध्यम कांदा- बारीक चिरून
१ मध्यम बटाटा – बारीक चिरून
अर्धा कप – बारीक चिरलेली सिमला मिर्ची
पाव कप – बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदीना पाने
१ टिस्पून – भजी मसाला
चवीनुसार मीठ

कृती

१. एका खोलगट भांड्यात सर्व भाज्या मिक्स करा आणि त्यात भजी मसाला घाला. चांगल मिक्स करून त्यावर एक झाकण घट्ट ठेवा. भाज्यांना मॅरीनेट करण्यासाठी २० मिनिटे झाकण तसेच ठेवा.
२. वीस मिनिटांनंतर मीठ आणि दोन्ही पीठ मिश्रणात घाला. हे सर्व छान मिक्स करा. लक्षात घ्या नेहमीच्या भजी पिठाऐवजी आपल्याला कणकेसारखे मिश्रण बनवायचे आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार २-२ टिस्पून पाणी घाला.
३. लोखंडी तवा गरम करा. बनवलेल्या मिश्रणाच्या छोट्या आकाराच्या पॅटी बनवा आणि मध्यम आचेवर भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी प्रत्येक पॅटी व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड होऊ द्या.
४. थंड झाल्यावर आपण त्यांना बेक करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता. प्रीहीटेड एअर फ्राअरमध्ये १०-१५ मिनिटांसाठी १८० डिग्री सेल्सिअसवर पॅटी ठेवा. जर तुम्हाला भजी बेक करायची असेल तर २०० डिग्री सेल्सिअसच्या आसपास बेक करा. बेक करतांना एकदा किंवा दोनदा पलटायला विसरू नकात. बेक झाल्यावर गरम गरम भजी सर्व्ह करा.