Tulsi Vivah 2021 Puja Vidhi, Shubh Muhurt, Time, Vrat Katha, Sahitya: यंदाच्या वर्षी तुळशीविवाह १५ नोव्हेंबरला आहे. कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शालिग्रामशी लावण्यात येतो. तुळशीविवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, असं मानलं जातं. लग्नाला उशीर झाल्यास लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व मानले जाते. जाणून घ्या तुळसी विवाहाची तयारी, साहित्य, पुजा विधी, शुभ मुहूर्त, विवाहाची योग्य पद्धत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळशी विवाहासाठी साहित्याची यादी: मुळा, आवळा, मनुका, रताळे, शिंगाडे, चिंचा, कोथिंबीर, पेरू आणि इतर हंगामातील फळं, मंडप तयार करण्यासाठी ऊस, भगवान विष्णूची मूर्ती, तुळशीचे रोप, धूप, दिवा, कपडे, हार, झेंडूचे फुले, श्रृंगार साहित्य, हळद, ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र, ओटी भरण्यासाठी साडी, चोळी, नथ, दागिने घालावे. मंगळसूत्र, जोडवी, खणा-नाराळ, मध, तीळ, एक कप दूध,

तुळसी विवाह विधि:
घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवा. तुळशी वृंदावन तसंच कुंडी रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढा. फ्लॅट संस्कृतीत अनेकांनी तुळशीला आपल्या बाल्कनीत जागा दिली असून त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली तरी चालेल. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा. तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर छान रांगोळीही काढता येईल. तुळशीला नवरीसारखे सजवू शकता. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरा. दुधात तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार करू शकता.

मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा. चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा. तुळशीला आणि शाळीग्रामला हळद लावावी. बनवलेल्या मंडपावरही हळदीची पेस्ट लावावी. लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी. यजमानाने म्हणून श्रीकृष्णाची पत्नीसोबतची मुर्ती उत्तराभिमुख आसनावर ठेवावी. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.

दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते.

आणखी वाचा : Tulsi Vivah 2021 Wishes in Marathi : तुळशी विवाहानिमित्त काही हटके Messages, Wishes, Whatsapp Status, SMS, Charolya पाठवून सणाचा आनंद द्विगुणीत करा…

तुळशी विवाह मुहूर्त:
एकादशी तिथी प्रारंभ- १५ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०६.३९ वाजता
एकादशी तिथी समाप्ती – १६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०८.०१ वाजता
१५ नोव्हेंबर, सोमवार रोजी तुळशी विवाह- दुपारी १.१० वाजल्यापासून दुपारी ३.१९ वाजेपर्यंत

तुळसी स्तुति मंत्र-
देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः
नमो नमस्ते तुळसी पापं हर हरिप्रिये।।

तुळसी पूजन मंत्र-
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

या दिवशी विष्णूचा शाळीग्राम अवतार आणि तुळशीची साग्रसंगीत आरती करावी. इतर देवांचीही आरती करावी. देवाला नैवेद्य दाखवावा. देवाला फक्त सात्त्विक गोष्टी, पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जातो, हे अवश्य लक्षात ठेवावं. एकादशीला भात खाणं वर्ज्य असतं. एकादशी व्रताची समाप्ती झाल्यानंतर ब्राह्मणांना दान-दक्षिणा द्यावी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi vivah 2021 puja vidhi shubh muhurt vrat katha puja time samagri mantra aarti rangoli design prp
First published on: 14-11-2021 at 21:20 IST