Turmeric Milk vs Warm Milk Which Helps You Sleep Better: रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याची सवय अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. काही जण साधे गरम दूध पिणे पसंत करतात, तर काहींच्या घरी रात्री हळदीचे दूध दिले जाते. लहानपणापासून आजी-आईने सांगितलेली ही सवय केवळ परंपरा आहे की त्यामागे आरोग्याशी संबंधित काही कारणेही आहेत? विशेष म्हणजे, साधे दूध आणि हळदीचे दूध या दोन्हींचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. मग शांत आणि चांगली झोप मिळवण्यासाठी या दोन्हींपैकी कोणते दूध अधिक फायदेशीर ठरते? याबाबत झोपविकारतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

साध्या गरम दुधामुळे झोप लागण्यास कशी मदत होते?

साध्या दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते. शरीराला प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या या घटकाचा मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या रसायनांच्या निर्मितीशी संबंध आहे. ही दोन्ही रसायने मनःस्थिती आणि झोपेच्या चक्राचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे रात्री कोमट दूध प्यायल्याने शरीराला शांत होण्यास आणि झोपेची तयारी करण्यास मदत मिळू शकते.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि टेनेसी विद्यापीठाच्या २०१५ मधील संशोधनाचा संदर्भही यासाठी दिला जातो. ट्रिप्टोफॅनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असलेल्या व्यक्तींमध्ये झोपेचा कालावधी आणि झोपेची गुणवत्ता चांगली असण्याचा संबंध आढळल्याचे या संशोधनातून सूचित झाले. मात्र, केवळ दूध प्यायल्याने प्रत्येकाला लगेच आणि शांत झोप लागेल असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

हळदीच्या दुधात नेमकं काय असतं खास?

हळदीच्या दुधाकडे केवळ पारंपरिक पेय म्हणून पाहिले जात नाही. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा सक्रिय घटक असतो. त्यामध्ये दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज कमी होण्यास हा घटक मदत करू शकतो.

झोप न लागण्यामागे अनेकदा ताणतणाव, चिंता किंवा शरीरातील वेदना ही कारणे असू शकतात. अशा वेळी हळदीच्या दुधाचा समावेश रात्रीच्या आरामदायी दिनक्रमात केल्याने काही जणांना शांत वाटू शकते. मात्र, हळदीतील कर्क्युमिन हे झोपेचे औषध किंवा गुंगी आणणारे घटक नाही, त्यामुळे हळदीचे दूध प्यायल्याने निद्रानाश दूर होतो असा दावा करता येणार नाही.

डॉक्टरांनी काय सांगितले?

फरीदाबाद येथील अमृता रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार आणि झोपविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप बजाज यांनी या दोन्ही पेयांविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘अनेक पिढ्यांपासून भारतीय घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध पिण्याची परंपरा आहे. काही जण साधे दूध पितात, तर काही जण त्यात हळद मिसळतात. यामुळे मन शांत होते आणि चांगली झोप लागण्यास मदत मिळते, अशी अनेकांची धारणा आहे. आता संशोधनातूनही साधे गरम दूध आणि हळदीचे दूध शरीरातील झोपेशी संबंधित प्रक्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात हे समोर येत आहे.’

हळदीचे दूध प्रत्येकाला मानवतेच असे नाही!

हळदीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर वाटत असले, तरी ते प्रत्येकाच्या शरीराला मानवेलच असे नाही. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांचे पोट संवेदनशील आहे, त्यांना हळदीमुळे काही वेळा पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तसेच ज्यांना लॅक्टोज पचत नाही, त्यांना साधे दूध आणि हळदीचे दूध या दोन्हींमुळे पोट फुगणे, गॅस किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्ती लॅक्टोजमुक्त दुधाचा पर्याय विचारात घेऊ शकतात.

मग झोपण्यासाठी कोणते दूध निवडावे?

जर तुम्हाला झोप लागण्यास मदत करणारे पेय हवे असेल, तर साध्या कोमट दुधाला ट्रिप्टोफॅनमुळे काही प्रमाणात वैज्ञानिक आधार आहे. दुसरीकडे, ताणतणाव किंवा शरीरातील अस्वस्थतेमुळे झोप लागत नसेल तर हळदीचे दूध रात्रीच्या आरामदायी दिनक्रमाचा भाग ठरू शकते. मात्र, दोन्हींपैकी एकच दूध सर्वांसाठी सर्वोत्तम आहे असे म्हणता येणार नाही.

शेवटी चांगली झोप मिळण्यासाठी केवळ दुधावर अवलंबून राहणे योग्य नाही. झोपण्याची नियमित वेळ पाळणे, रात्री मोबाईलचा वापर कमी करणे, कॅफिनयुक्त पेये टाळणे आणि शांत वातावरणात झोपणे या सवयीही महत्त्वाच्या आहेत. दूध हे झोपेसाठी पूरक ठरू शकते; मात्र झोपेच्या समस्येवर उपचारांचा तो पर्याय नाही.