बहुआयामी ‘ज्युपिटर १२५’

आसनाखालील जागेत दोन हेल्मेट सहज बसतील इतकी जागा देण्यात आली आहे.

बापू बैलकर bapu.bailkar@gmail.com

‘जादा से जादा’ या टॅगलाइनसह टीव्हीएस मोटर कंपनीने सणउत्सव काळात आपली सर्वाधिक पसंती असलेली ज्युपिटर स्कूटर आता ‘नव्या ढंगात, नव्या रूपात’ बाजारात आणली आहे. १२५ ‘सीसी’मध्ये तिची निर्मिती करण्यात आली असून इंधनाबाबत परवडणारी, कुटुंबातील सर्वच वयोगटातील सदस्यांसाठी उपयुक्त असून कंपनीने स्कूटर प्रकारात पहिल्यांदाच काही नावीन्यपूर्ण प्रयोग करीत तिला नवा आयाम दिला आहे. या स्कूटरची किंमत कंपनीने ७३,४०० रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) जाहीर केली आहे.

या स्कूटरची रचना बदलली असून तिची इंधन टाकी आता चालकाच्या पायाखाली असेल तर इंधन भरण्यासाठीची जागाही आता समोरच्या बाजूला दिली आहे. तसेच स्कूटर प्रकारात सर्वाधिक जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आसनाखालील जागेत दोन हेल्मेट सहज बसतील इतकी जागा देण्यात आली आहे.

टिव्हिएस ही दुचाकी व तीन चाकी बनविणारी आघाडीचे कंपनी आहे. त्यांची यापूर्वी ‘ज्युपिटर ११०’ ही बाजारात उपलब्ध असून तिला ग्राहकांची चांगली पसंती आहे. करोनामुळे सार्वजनिक प्रवासी वाहनांतून प्रवास करताना काही मर्यादा आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य नागरिकही स्वत:च्या वाहनातून प्रवास करणे योग्य समजतात. त्यामुळे  शहरांतर्गत वाहतुकीसाठी परवडणारा व कुटुंबातील सर्वच वयोगटातील घटकांना योग्य पर्याय ग्राहक शोधत आहेत. त्यात इंधनाचे दरही प्रचंड वाढल्याने प्राधान्याने इंधनदृष्टय़ा परवडणारी वाहने घेण्याकडे कल वाढला आहे. यापार्श्वभूमीवर टिव्हिएस मोटरने हा सर्व कल डोळयासमोर ठेवत ‘ज्युपिटर १२५’ बाजारात आणली आहे. १२५ सीसीमध्ये कंपनीची एन टॉर्क बाजारात आहे. मात्र ही स्कूटर युवावर्ग डोळयासमोर बनविण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीने  ‘ज्युपिटर १२५’ अधिक आरामदायी, आसनाच्या खाली सर्वात जास्त मोठी डिकीची जागा, सर्वात लांब आसन, नावीन्यपूर्ण प्रगतिशील स्टायलिंग आणि उत्तम मायलेज देणारी ही स्कूटर बाजारात आणल असल्याचा दावा केला आहे.

 कंपनीने त्यांच्या बंगळूरु येथील प्रकाल्पात नुकतीच माध्यमांसाठी या स्कूटरची ‘टेस्ट राइड’ आयोजित केली होती. यात आंम्ही ही स्कूटर कंपनीच्या तपासणी मार्गिकेवर चालवून पाहिली. यात आलेले अनुभव पुढे देत आहोत.  

‘ज्युपिटर १२५’ नव्या, प्रगतिशील शैलीमध्ये असून क्रोमचा जागोजागी वापर करण्यात आल्यामुळे तिला अधिमूल्य (प्रीमियम) प्राप्त झाले आहे. पुढील दिवा एलईडी प्रकारातील असून मागील दिवाही आकर्षित करणारा आहे. गाडीची रचना करताना मेटलचा वापर करण्यात आला आहे. डायमंड कट अ‍ॅलॉय व्हिल्समध्ये डिस्क प्रकारात ही स्कूटर असल्याने ती अधिकच उठावदार दिसत आहे.

चालकाच्या सुलभतेसाठी व सुरक्षेसाठी ‘सेमी डिजिटल स्पीडोमीटर’ दिलेला आहे. त्यावर गाडीचे सरासरी आणि प्रत्यक्षात मिळत असलेले मायलेज दाखवले जाते. तसेच चालकाला सुरक्षेबाबत सतर्क करण्याचा प्रयत्न करते.

या स्कूटरमध्ये एक सिलिंडर, ४ स्ट्रोक, एअर कुल्ड १२४.८ सीसी इंजिन वापरण्यात आले आहे. ते  ६५०० आरपीएमवर ६ किलोवॅटपर्यंत तर ४,५०० आरपीएमवर १०.५ न्यटर्न मीटर उर्जाशक्ती प्रदान करते. मात्र ही स्कूटर युवा वर्गाची (ज्यांना वेगवान वाहन चालवण्याची सवय आहे) थोडी निराशा नक्की करेल. स्कूटर सुरू केल्यानंतर ती ४० ते ५० पर्यंतचा वेग अगदी सहज पार करते. ५० ते ७० पर्यंत वेग गाठतानाही अडचण येत नाही. मात्र या पुढे वेग हवा असेल तर मात्र निराशा होते. आम्ही ही स्कूटर ताशी प्रतिकिलोमीटर ९० पर्यंतचा वेग गाठला. मात्र तो गाठताना थोडी दमछाक झाल्याचा अनुभव आला. मात्र या स्कूटरची रचनाच मुळात यासाठी नाही. कुटुंबातील महिला असो की ज्येष्ठ. त्यांना ती सहज व आरामदायीपणे हाताळता येईल, हे नक्की.

स्कूटर कुठलाही आवाज न करता सहज सुरू होते. बसण्याची जागाही आरामदायी व प्रशस्त आहे. विशेष म्हणजे गडीची रचना करताना तिचे वजन जास्तीत जास्त कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ती हलकी वाटते. तीव्र वळणांवर स्कूटरवचरचा चालकाचा ताबा सुटत नाही. वजन १०८ किलो असल्याने ती हलकी असल्याने हताळायला सहज आहे. जमीनीपासूनचे अंतरही १६५ मिमी असल्याने खराब रस्त्यांवरही काही प्रश्न निर्माण होणार नाही. बेकींग चांगली आहे. आगदी ७० ते ८० वेग असतानाही वेग नियंत्रणात आणता येतो. पाय सहज जमिनीवर टेकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गाडीवरचा ताबा सुटत नाही, आगदी तीव्र वळणावरही. त्यामुळे ही स्कूटर कुटुंबातील सर्व वायोगटातील सदस्यांसाठी पर्याय ठरू शकते.

परवडणारी आहे का?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती परवडणारी आहे का? मग ती किमतीच्या बाबतीत असो की इंधनाच्या. तर याचे उत्तर काही प्रमाणात तरी होय असे देता येईल. या स्कूटरची किंमत कंपनीने ७३,४०० रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) जाहीर केली आहे. स्कूटरमध्ये दिलेली वैशिष्टय़े व सुविधा पाहता किंमत जास्त वाटत नाही. मायलेजही ठिकठाक देते. कंपनीच्या ट्रॅकवर चालविण्याच्या घेतलेल्या अनुभवावरून ती ४५ ते ५५ पर्यंत मायलेज देईल, असे वाटते. रस्त्याची रचना व वेगमर्यादा आणि चालकाचा चालविण्याचा अनुभव यावर मायलेज अवलंबून असेल. काहींना या स्कूटरने अगदी ६० ते ६५ पर्यंतही मायलेज दिले आहे. त्यामुळे ही स्कूटर दैनंदिन शहरांतर्गत वाहतुकीसाठी (० ते १०० किलोमीटर) विविध वयोगटासाठी इंधन व मायलेजबाबत एक परवडणारा बहुआयामी पर्याय ठरू शकते.

‘जादा से जादा’ काय?

’ उत्तम कामगिरी आणि ठिकठाक मायलेज.

’ असनाखाली सर्वात जास्त जागा.(दोन हेल्मेट सहज बसतात)

’ या विभागातील गाडय़ांमधील सर्वात मोठे आसन.

’ मेटलमॅक्स बॉडी.

’ पुढच्या बाजूला इंधन भरणा टाकी.

’ पुढच्या बाजूला मोबाइल चार्जर सुविधा व मोबाईल ठेवण्यासाठी कप्पाही.

’ सरासरी आणि प्रत्यक्षात मिळत असलेले मायलेज दर्शविणारा सेमी डिजिटल स्पीडोमीटर.

’ साइड स्टँडवर गाडी असल्याचे दाखविणारा इंडिकेटर आणि इंजिन इनहिबीटर.

’ बॉडी बॅलन्स तंत्रज्ञान.

’ पाय ठेवायला पुढे मोठी जागा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tvs motor launches jupiter 125cc scooter with new model zws

ताज्या बातम्या