काही जनुके बंद केल्यास आयुर्मान वाढवणे शक्य

वार्धक्य लांबवण्यासाठी काही जनुके बंद करण्याचा प्रयोग माणसातही लवकरच यशस्वी होण्याची शक्यता आहे. काही जनुके बंद केली तर यीस्ट पेशींचे आयुष्य वाढते असे दिसून आले आहे. यात अशी जनुके शोधण्यात येत आहेत जी बंद केल्यानंतर माणसाचे आयुर्मान वाढू शकते. सस्तन प्राण्यांमध्ये अनेक जनुके कार्यरत असतात. त्यात काहींमुळे माणसाचे आयुर्मान कमी होत असते. ती बंद केली की, आयुर्मान साठ टक्के वाढते व वार्धक्यही लांबते.

बक इन्स्टिटय़ूट फॉर रीसर्च ऑन एजिंग व वॉशिंग्टन विद्यापीठ यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, २३८ जनुके बंद केली की, एस. सेरेव्हिसाय या यीस्ट पेशींचे आयुष्य वाढते. त्यातील १९९ जनुके वार्धक्याशी निगडित असतात. संपूर्ण जनुकीय संकेतावलीच्या दृष्टिकोनातून हा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे वार्धक्याच्या प्रक्रियेवर प्रकाश पडला आहे, असे बक इन्स्टिटय़ूट फॉर रीसर्च ऑन एजिंग या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन केनेडी यांनी सांगितले. संशोधकांनी यीस्टचे ४६९८ प्रकार तपासले. त्यात प्रत्येकी एक जनुक काढूनच टाकण्यात आल्यामुळे काय परिणाम होतो हे तपासण्यात आले. कोणत्या यीस्ट पेशी जास्त जगतात हे पाहिले गेले. मातृपेशीपासून त्यांचे विभाजन थांबण्यापूर्वी किती जन्य पेशी (डॉटर सेल्स) तयार होतात याचाही विचार यात करण्यात आला. सूक्ष्मदर्शकाला लहान सुई जोडून त्याच्या मदतीने जन्य पेशीला वेळोवेळी विभाजनप्रसंगी उत्तेजित केले गेले व नंतर मातृपेशीचे विभाजन किती वेळा झाले हे मोजण्यात आले. यातून बरीच माहिती मिळाली असून त्यात यीस्टमध्ये विविध जनुके कशी काम करतात, त्यांच्या मार्गिका कोणत्या असतात, त्यांच्यातील वार्धक्य कसे नियंत्रित करता येईल याचा विचार करण्यात आला. एलओएस १ या जनुकाच्या मदतीने आरएनए हस्तांतराचे फेरनियोजन केले जाते. त्यात अमायनो आम्ले रायबोसोममध्ये आणून प्रथिनांची बांधणी होते. यात एलओएस १ वर एमटीओआर या जनुकीय बटनाचा प्रभाव असतो व ते उष्मांक नियंत्रणाशी संबंधित असते त्यामुळे आयुर्मान वाढते. एलओएसचा प्रभाव जीसीएन ४ या जनुकावर पडतो. हे जनुक डीएनएची हानी नियंत्रित करीत असते. उष्मांक नियंत्रणामुळे आयुर्मान वाढते हे आधीपासून माहिती आहे. डीएनएची हानी ही वार्धक्य जवळ आणत असते. एलओएस१ चा यात मोठा संबंध असतो. सी इलेगन्स गोलकृमींमध्येही आयुर्मान वाढवणारी जनुके सापडली असून यीस्टवर जे संशोधन झाले आहे ते माणसातही आयुर्मान वाढवण्यात उपयोगी आहे. या प्रयोगात वार्धक्याच्या किंवा वय वाढण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करणारी जी जनुके सापडली आहेत त्यातील निम्मी सस्तन प्राण्यातही असतात, असे वैज्ञानिक केनेडी यांनी सांगितले. सेल मेटॅबोलिझम या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.