Ultra Processed Fod Side Effect: अनियमित आहार, झोपेचा अभाव, चुकीच्या जीवनशैलीमुळे अल्ट्रा- प्रोसेस्ड फूड म्हणजेच पॅकेज्ड फूड प्रत्येकाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. चिप्स, बर्गर, सोडा आणि रेडी-टू-इट जेवण दिसायला आणि चवीला चांगले असले तरी त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ‘रेडिओलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे (UPF) अतिसेवन करतात, त्यांच्या मांडीच्या स्नायूंची गुणवत्ता खालावत आहे. एमआरआय स्कॅनमध्ये असे आढळून आले आहे की, या पदार्थांच्या सेवनामुळे स्नायूंमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे शरीराची ताकद नष्ट होते.
पॅकेज्ड फूड आरोग्यासाठी घातक?
संशोधकांनी गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका असलेल्या ६१५ लोकांच्या एमआरआय डेटाचे विश्लेषण केले आणि त्यांना आढळले की, अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा थेट संबंध स्नायूंमध्ये चरबी जमा होण्याशी आहे. याचा अर्थ असा की, जरी स्नायू बाहेरून सामान्य दिसत असले तरी त्यांच्या अंतर्गत तंतूंमध्ये चरबी जमा होऊ लागते.
जेव्हा स्नायूंमध्ये चरबी जमा होते, तेव्हा त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि ही समस्या सामान्य वजन असलेल्या लोकांमध्येही दिसून आली आहे. याचा अर्थ असा की, जंक फूड केवळ वजन वाढण्यासच हातभार लावत नाही, तर निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा तुमच्या स्नायूंवरही थेट परिणाम होतो.
मांडीचे स्नायू संतुलन आणि हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. संशोधकांच्या मते, जर स्नायूंची गुणवत्ता सतत खालावत राहिली तर वृद्धापकाळात व्यक्तीची हालचाल करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
या संशोधनात असे आढळून आले आहे की, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा धोका अधिक असतो. अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, तर प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असते. या पौष्टिक असंतुलनामुळे शरीराची स्नायू आणि हाडांची प्रणाली कमकुवत होत आहे. लठ्ठपणा हा देखील एक धोका आहे.
संशोधनात असे आढळून आले आहे की, शरीराचे एकूण वजन (बीएमआय) विचारात घेतल्यानंतरही हा धोका कमी होत नाही. कंबरेचा घेर मोठा असणे आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे, यामुळे स्नायूंमध्ये चरबी जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
गुडघेदुखी आणि भविष्यातील शारीरिक अशक्तपणा टाळण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. ताज्या भाज्या, फळे आणि घरगुती जेवण स्नायूंना दीर्घकाळ मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.
