Lung Cancer Early Symptoms : झपाट्याने वजन कमी होणे, भूक न लागणे ही एका गंभीर समस्येची लक्षणे असू शकतात. डॉक्टर अशा स्थितीत तपासणी करून घेण्याचा सल्ला देतात. वैद्यकीयदृष्ट्या ही लक्षणे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचीदेखील असू शकतात. बहुतेक लोक खोकला, सौम्य ताप, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या लक्षणांकडे सामान्य जंतुसंसर्ग, ॲलर्जी किंवा हवामानातील बदलाचे परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. अशा स्थितीत ते औषधे घेऊन काही दिवस विश्रांती घेतात आणि सर्व काही ठीक होईल, अशी आशा करतात.
परंतु जर ही समस्या पुन्हा उद्भवली किंवा अनेक आठवडे टिकून राहिली, तर ती लक्षणे केवळ एका संसर्गामुले उद्भवलेली नसून, ती फुप्फुसाच्या कॅन्सरची प्राथमिक लक्षणेदेखील असू शकतात. त्याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना मॅक्स हॉस्पिटलच्या मेडिकल ऑन्कोलॉजी विभागातील डॉ. समीर खत्री यांनी काही महत्वाची माहिती दिली आहे.
तज्ज्ञांनी काय सांगितले?
तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसाच्या कर्करोगातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणे एखाद्या सामान्य श्वसनमार्गाच्या संसर्गासारखीच असू शकतात. त्यामुळे अनेक रुग्ण आजार बळावल्याशिवाय डॉक्टरांकडे जात नाहीत.
दुर्लक्ष करू नये अशी लक्षणे :
१) तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला आहे.
२) अनेक दिवसांपासूनच्या खोकल्याचा त्रास अचानक वाढतो किंवा त्याचे स्वरूप बदलते.
३) खोकल्यातून रक्त पडणे, जरी त्याचे प्रमाण कमी असले तरी.
४) वारंवार होणारा न्यूमोनिया किंवा छातीचे संक्रमण
५) धाप लागणे किंवा पूर्वीपेक्षा लवकर थकवा येणे
६) सतत छातीत दुखणे किंवा जडपणा
७) आवाज जाणे
८) अचानक वजन कमी होणे किंवा भूक न लागणे
धूम्रपान न करणाऱ्यांना अधिक धोका
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच होणारा आजार नाही. धूम्रपान हे निश्चितपणे सर्वांत मोठे धोक्याचे कारण आहे; परंतु अप्रत्यक्ष धूम्रपान, वायुप्रदूषण, विशिष्ट औद्योगिक रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आणि कौटुंबिक इतिहास यांमुळेही धोका वाढू शकतो. आज आपल्या देशात ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही अशांनाही या आजाराचा धोका वाढतोय.
कर्करोगाची भीती एक समस्या
तज्ज्ञांच्या मते, घाबरण्याची गरज नाही. कारण- सततच्या खोकल्याचे प्रत्येक लक्षण कर्करोग नसते. परंतु, जर लक्षणे २३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, उपचारांनंतरही व्यक्तीमध्ये सुधारणा होत नसतील किंवा वारंवार उद्भवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आवश्यक असल्यास एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा इतर चाचण्यांमुळे नेमके कारण शोधण्यात मदत होऊ शकते.
सध्या आधुनिक पद्धतीने फुप्फुसाच्या कर्करोगावर उपचार करणे शक्य आहे. जर हा आजार लवकर ओळखला गेला, तर उपचारांचे चांगले परिणाम मिळू शकतात आणि मग असे अनेक रुग्ण दीर्घ, सामान्य व सक्रिय आयुष्य जगतात.
