Don’t Eat eggs and milk together: अंडी त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांना सर्वाधिक आवडणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. अंडी आणि दूध या दोन्हींमध्ये आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने, अमिनो ॲसिड्स आणि कॅल्शियमचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे शरीर आणि मेंदू यांचा विकास आणि त्यांचे कार्य उत्तम तऱ्हेने चालू राहावे यासाठी आवश्यक असतात. अनेक जण सकाळच्या नाश्त्यात दुधाबरोबर अंड्याचेही सेवन करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेदानुसार, एकाच वेळी दोन प्रकारच्या प्रथिनांचे सेवन केल्याने पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊन पोट फुगणे, अस्वस्थता, पोटदुखी व जुलाब अशा त्रासांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, अनेक अन्नपदार्थ बनवताना बहुतेकदा अंडी आणि दूध यांचा एकत्रच वापर केला जातो. परंतु, हे दोन्ही पदार्थ एकत्र मिसळून वापरणे सुरक्षित आहे का आणि दूध व अंडी एकत्र खाणे टाळायला हवे का?
दूध-अंडी एकत्र खावी?
तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा विचार करीत असाल तरी अंडी आणि दूध हे दोन अत्यावश्यक पदार्थ तुमच्या आहारात नेहमीच असतात. पण, या दोन्ही पदार्थांना एकत्र मिसळल्यावर काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
काहींच्या मते, दूध आणि अंडी एकत्र खाणे स्नायूंचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगले आहे; तर काहींच्या मते या मिश्रणामुळे पचनाला त्रास होऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये त्वचेचे संक्रमणदेखील होऊ शकते. तथापि, स्वयंपाकासाठी अंडी आणि दूध एकत्र मिसळण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत; उलट, या दोन्हींच्या मिश्रणामुळे नैसर्गिकरीत्या आरोग्य सुधारते आणि पदार्थाची चव व पोत सुधारतो. मात्र, कच्ची अंडी खाणे किंवा दुधात मिसळणे पूर्णपणे टाळले पाहिजे. कारण- त्यामुळे अनेक अनारोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, कच्ची अंडी खाल्ल्याने किंवा दुधात मिसळून त्यांचे प्राशन केल्याने पचनाचे विकार उदभवू शकतात, पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि साल्मोनेलासारखे आजार होऊ शकतात. दूध आणि कच्ची अंडी एकत्र करण्याच्या या सवयीमुळे अन्नातून विषबाधा, तसेच बायोटिनची कमतरता होऊ शकते. हे तेव्हा घडते जेव्हा अंड्यामधील प्रथिने बायोटिनच्या संयुगांशी जोडली जातात आणि शरीरातील त्यांच्या शोषणात अडथळा आणतात.
त्यामुळेच कच्ची अंडी दुधात मिसळणे ही एक वाईट कल्पना आहे. जे लोक वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते स्नायू आणि शरीराच्या जलद विकासासाठी अनेकदा कच्ची अंडी आणि दुधाचे सेवन करतात; परंतु यामुळे दीर्घकाळात त्यांच्या बाबतीत कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढू शकतो. म्हणून जर तुम्ही खरोखरच शरीराल मजबूत बनवू इच्छित असाल, तर शिजवलेली अंडी आणि दुधाचे सेवन करणे सर्वोत्तम आहे. परंतु, जर तुम्हाला पचन आणि आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या टाळायच्या असतील, तर या दोन प्रकारच्या प्रथिनांचे सेवन करताना मधे एक तासाचे अंतर ठेवले गेलेय ना याची खात्री करून घ्या.
