Coconut Benfits: छकेंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रातील ‘उच्च-मूल्य पिकां’वर (High Value Crops) विशेष भर देत नारळ उत्पादनाला केंद्रस्थानी आणले. किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या या पिकासाठी स्वतंत्र ‘नारळ प्रोत्साहन योजना’ (Coconut Promotion Scheme) जाहीर करण्यात आली असून, तिच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन नारळ विकास मंडळ (Coconut Development Board) करणार आहे.

नारळ प्रोत्साहन योजना काय आहे? (Coconut Promotion Scheme)

या योजनेअंतर्गत जुन्या, रोगट किंवा कमी उत्पादन देणाऱ्या नारळ झाडांची जागा उच्च उत्पादनक्षम रोपांनी घेतली जाणार आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, शाश्वत शेती पद्धती स्वीकारणे, मूल्यवर्धनाला चालना देणे आणि बाजारपेठेशी थेट जोड निर्माण करणे, हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे केवळ नारळाचे उत्पादन वाढणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवे बळ मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.

जागतिक स्तरावर भारताची भूमिका (India’s Global Position)

सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. सुमारे ३ कोटी लोकांचे जीवनमान या पिकावर अवलंबून असून, जवळपास १ कोटी नारळ शेतकऱ्यांना या नव्या धोरणाचा थेट लाभ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. उत्पादन वाढीसोबतच प्रक्रिया उद्योग, निर्यात आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील, असा अंदाज आहे.

‘निसर्गाची सुपरफूड’ अशी ओळख (Nature’s Superfood)

आरोग्यतज्ज्ञांमध्येही या निर्णयाबाबत उत्साह आहे. आहारतज्ज्ञ साक्षी सिंह यांच्या मते, नारळ हे निसर्गाने दिलेले संपूर्ण अन्न आहे. नारळपाणी, गर(मलई किंवा खोबरे), तेल आणि दूध, नारळ्याच्या शेंड्या – या प्रत्येक घटकातून शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात. पचनसंस्थेचे आरोग्य, ऊर्जावाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी नारळ उपयुक्त ठरतो.

पोषणमूल्यांचा खजिना (Nutritional Benefits)

नारळामध्ये असलेले मध्यम-साखळी ट्रायग्लिसराइड्स (Medium-Chain Triglycerides) शरीरात सहज पचतात आणि पटकन ऊर्जेत रूपांतरित होतात. नारळपाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचे उत्तम स्रोत असून, हृदय व स्नायूंच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. नारळाचा गर आहारातील तंतूंनी समृद्ध असल्याने पचन सुधारतो आणि पोट भरल्याची भावना टिकून राहते. मर्यादित प्रमाणात वापरलेले नारळतेल जंतुनाशक गुणधर्मांमुळे प्रतिकारशक्तीला हातभार लावते.

इतर उच्च-मूल्य पिकांनाही चालना (Other High-Value Crops)

नारळासोबतच सरकारने चंदन, कोको, काजू, ईशान्य भारतातील Agarwood(उद) तसेच डोंगराळ भागातील अक्रोड, बदाम आणि पाइन नट्स (चिलगोजा) यांसारख्या पिकांनाही प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, उच्च-घनता लागवड आणि मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित करत ग्रामीण युवकांना कृषी उद्योजकतेकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कृषी उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न, ग्रामीण रोजगार आणि आरोग्य – या सर्व पातळ्यांवर परिणाम करणारा हा निर्णय भविष्यातील शेती धोरणासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.